| पनवेल | वार्ताहर |
मुंब्रा- पनवेल महामार्गावरील खांदा वसाहती जवळील उड्डाणं पुलाला भंगार विक्रेत्याने विळखा घातला आहे. या ठिकाणी गॅसकटर च्या साहाय्याने वाहन कापण्याचे काम केले जात असल्याने उड्डाणं पुलाच्या सुरक्षिततेला देखील धोका उत्पन्न झाला असतानाही पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून या कडे दुर्लक्ष केले जात असल्याने भविष्यात या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास याला जवाबदार कोण असा सवाल शेकाप तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी उपस्थित केला आहे.
मुंंब्रा – पनवेल महामार्गावर खान्देश्वर आणि पनवेल ला जोडणार्या हार्बर रेल्वे मार्गांवर रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. खांदा वसाहत आणि धाकटा खांदा गाव परिसरात आलेल्या या रेल्वे पुला खाली मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असून, या जागेचा ताबा बेकायदेशीर पणे भंगार व्यवसाय करणार्या एका व्यवसायिकाने घेतला आहे.या विक्रेत्याने रेल्वे पुला खालील जवळपास पंन्नास टक्के भाग व्यापला असून,हा व्यावसायिक या ठिकाणी भंगार साहित्या सोबत भंगार वाहणांची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणार्या गॅस कटर आणि गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी करत असल्याने उड्डाणं पुलाला धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे पुला खालून जाणार्या रेल्वे रुळाना देखील धोका पोहचण्याची शक्यता आहे.
तक्रार करूनही दुर्लक्ष
रेल्वे पुला खाली सुरु असलेल्या या व्यवसाया विरोधात शेकाप तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी पालिका अधिकार्यांकडे तक्रार केली होती. एक महिन्या पूर्वी करण्यात आलेल्या तक्रारी नंतरही या ठिकाणी कारवाई करण्यात आली नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अडसूळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत त्याच वेळी प्रभाग अधिकार्यांना या बाबत माहिती देण्यात आली होती. त्या नंतर संबंधित व्यवसायिकावर तात्काळ कारवाई करण्यात आली. कैलास गावडे. उपाआयुक्त.
गॅस सिलेंडरमुळे धोका
रेल्वे पुलाच्या खांबा जवळच गॅस सिलेंडर ठेवले जात आहेत. भविष्यात या ठिकाणी गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन दुर्घटना घडल्यास याला जवाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.