घराच्या परिसरात खारीचे दर्शन झाले दुर्लभ
| माणगाव | प्रतिनिधी |
शांत, भित्रट व तुरुतुरु धावणारी खार हा वन्यप्राणी एकेकाळी गावाची ओळख असायची. घराच्या अंगणात परसात आजूबाजूला लहान मोठ्या झाडांमध्ये हमखास खारुताईची सळसळ ऐकू यायची. मात्र ग्रामीण भागात विकासाच्या नावावर वाढलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे तिने आपला मोर्चा आता जंगलाकडे वळवल्याचे चित्र आहे.
गावांमध्ये कुडामेडींची, गवत पेंढ्यांची घरे जाऊन आता सिमेंटची पक्की घरे निर्माण झाली आहेत, आजूबाजूला असणारी छोटी-मोठी झाडे कमी झाली आहेत, त्याचप्रमाणे गावाच्या आजूबाजूला असलेले बांबूची बेटे देखील कमी होत गेल्याने खारु या प्राण्याचा अधिवास कमी होत गेला आहे. खारुताई ही शांत व उंच झाडांच्या शेंड्यांवर घर बांधून राहणारी आहे.
महाराष्ट्रात चार प्रकारच्या खारी आढळतात, तर जगभरात एकूण 200 प्रकारच्या खारींच्या प्रजाती आढळून येतात. छोटी-मोठी फळ खाणारी आपल्या तिष्न दातांनी फळांचा आस्वाद घेणारी खार समृध्द वन संपदेचे प्रतीक मानले जाते. गावाबाहेरच्या जंगलांमध्ये खार मोठया प्रमाणात दिसू लागली असून खार प्राण्यांनी जंगलांना जवळ केल्याचे प्राणी प्रेमी सांगतात.
अनेक गोष्टी, कथा आणि कवितेतून खार हा प्राण्याचे वर्णन आढळते. रामायणातही खारुताईचा उल्लेख असून खारीच्या पाठीवर असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पट्ट्यामुळे खार विषयीची एक उत्सुकता सर्वसामान्यांमध्ये असते. शेकरू या प्राण्याशी साधर्म्य साधणारी खार गावांमध्ये दुर्मिळ झाल्याने प्राणी प्रेमींमध्ये नाराजी आहे. गेल्या काही वर्षांपासून गाव संस्कृतीमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम खारुताईच्या दैनंदिनीवर पडत असतो. खार बहुतांशी शाकाहारी प्राणी आहे. वड, पिंपळ यासारख्या मोठ्या झाडांवर बहुतांश तिचे वास्तव्य असते. या झाडांची फळे या प्राण्याला आवडतात.