विविध दाखले मिळवण्यासाठी ग्रामस्थांचे हाल
| म्हसळा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील खारगाव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय गेल्या काही दिवसांपासून कुलूपबंद असल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. 5 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगडने लाचप्रकरणी ग्राम अधिकारी व प्रशासकांवर कारवाई केल्यानंतर कार्यालय बंद करण्यात आले असून, अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाही.
कार्यालय बंद असल्यामुळे विविध दाखले मिळविणे, घरपट्टी भरणा, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आदी महत्त्वाची कामे रखडली आहेत. “कार्यालय बंद असेल तर नागरिकांनी जायचे कुठे?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मोर्चा काढत म्हसळा तहसील कार्यालयावर धडक दिली आणि मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. तहसीलदार श्रीमती आंबुर्ले यांच्या हस्ते हे निवेदन स्वीकारण्यात आले.
ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव जाधव यांच्यावरही आरोप करत, त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय पूर्ववत सुरू करण्यास असमर्थता दर्शवून ग्रामस्थांना वेठीस धरले असल्याचे म्हटले आहे. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. गावातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत ग्रामस्थांनी प्रशासनाला 7 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालय सुरू करून ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा महिला मंडळासह सर्व ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.
आमच्या मागण्या योग्य असून त्या तातडीने पूर्ण न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. मोर्चा व निवेदन सादर करताना माजी सभापती महादेव पाटील, गाव अध्यक्ष बाळकृष्ण म्हात्रे, आली अध्यक्ष लक्ष्मण पाटील, रामभाऊ लोणशीकर, विश्वास खोत, चंद्रकांत कांबळे, नरेश मेंदडकर, बाळा म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
