खारघर दारूमुक्तीसाठी सर्वपक्षीय एकत्र

| नवीन पनवेल । वार्ताहर ।

खारघर शहर दारूमुक्त शहर असावे, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेला निरसुख पॅलेस आणि पूर्वीपासून सुरू असलेला अजित पॅलेस बार कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी खारघर वासियांनी लढा देण्याचा संकल्प नुकताच झालेल्या बैठकीत केला आहे. ही लढाई कायदेशीर मार्गाने संघर्ष समितीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

शहरात 15 वर्षांपूर्वी सुरू झालेले दारूचे दुकान रहिवाशांच्या प्रखर संघर्षामुळे बंद करावे लागले होते. बार संस्कृती उदयास येवू नये, म्हणून प्रखर विरोध असताना रायगड जिल्हा महसूल विभागाने कोणत्या आधारे बारला परवाना दिला, परवाना देताना पोलिस, महापालिका आणि सिडकोकडून लागणारे ना हरकत पत्राची मागणी केली का, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहरात जनजागृतीचा संकल्प
15 वर्षांपूर्वी सुरू केलेले दारूचे दुकान बंद करण्यासाठी खारघरमधील 35 संस्था, संघटना, राजकीय पक्ष एकत्रित आले होते. आता सुरू झालेला निरसुख पॅलेस आणि पूर्वीपासून सुरू असलेला अजित पॅलेस बार बंद व्हावे, यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या लढ्यात जास्तीत जास्त नागरिक सहभाग व्हावे. तसेच सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि परिसरातील गावांनी विशेषतः महिलांनी आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होत, जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे.

Exit mobile version