खेड कंत्राटी अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

। खेड । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी कनिष्ठ अभियंता म्हणून खेड पंचायत समिती कार्यरत असलेल्या चंद्रकांत गणपत गमरे वय – 42 याला भरणे येथे दुपारच्या सुमारास पन्नास हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले.
मंडणगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 14 उपकेंद्रांची दुरुस्ती व अद्यावतीकरण करणे करता ई निविदा प्रसिद्ध झाली होती. हे काम 50 लाख 6 हजार 491 रुपयांचे होते. या कामाची देखरेख व मुल्यांकन करण्याची जबाबदारी जिल्हापरिषद मार्फत कंत्राटी कनिष्ठ अभियंता यांच्याकडे देण्यात आली होती. या कामाच्या ठेकेदाराकडून त्यांनी केलेल्या कामाच्या रक्कमेच्या दोन टक्के प्रमाणे 60 हजार रुपये गमरे यांनी मागितले होते. संबंधित ठेकेदाराने गमरे यांच्याविरुद्ध ता. 24 संप्टेबर रोजी रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे संपर्क साधून तक्रार दिली होती. तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, संदीप ओंबले, संतोष कोळेकर विशाल नलावडे, योगेश हुंबरे, हेमंत पवार, राजेश गावकर यांच्या पथकाने खेड तालुक्यातील भरणे गणेश नगर येथे सापळा रचून 50 हजार रुपये स्विकारताना गमरे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Exit mobile version