निधी अभावी एप्रिल महिन्याचे मानधन रखडले
| अलिबाग | प्रमोद जाधव |
ग्रामीण भागातील गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा चांगल्या मिळाव्या म्हणून पाच हजार लोकसंख्येमागे जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केल आहे. मात्र या आरोग्य केंद्रातील डॉक्टरच आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी 40 उपकेंद्रातील कंत्राटी डॉक्टर मानधनाविना सेवा देत आहेत. सरकारकडून निधी वेळेमध्ये येत नसल्याचा फटका या डॉक्टरांना बसत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख पेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात दोन हजार पेक्षा अधिक गावे, व वाड्यांचा समावेश आहे. गावे, वाड्यांमधील रुग्णांवर वेळेवर उपचार करता यावा यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित 54 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रामध्ये बीएचएमएस दर्जाचे वैद्यकिय अधिकारी आहेत. त्यामध्ये 44 प्राथमिक आरोग्य केंद्रात अकरा महिन्याच्या करारावर कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. या डॉक्टरांना दर महिन्याला 40 हजार रुपये प्रमाणे मानधन दिले जाते. बाह्य कक्षामार्फत नियमीतपणे रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविणे अशा अनेक प्रकारची कामे या वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत केली जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रात्री, बेरात्री रुग्णांना सेवा देणाऱ्या या कंत्राटी डॉक्टरांना वेळेवर मानधन देण्यास जिल्हा परिषद आरोग्य विभाग उदासीन ठरले असल्याचे चित्र समोर आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हा प्रकार घडत असल्याने कामावर त्याचा परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यात आलेल्या 30 लाख निधीतून कंत्राटी डॉक्टरांचे मानधन दिले. मात्र उर्वरित 40 प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना मानधन मिळाले नाही. मे महिना संपत आला असताना, एप्रिल महिन्यांचे मानधन अद्यापही मिळाले नसल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत दबक्या आवाजात नाराजीचे सुर या डॉक्टरांकडून व्यक्त होत आहेत.
जिल्ह्यातील 40 वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मानधन रखडले आहे. शासनाकडून 25 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाल्यास मानधन दिले जाईल असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र निधी येण्याबाबत सावळा गोंधळ कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.