। खेड । प्रतिनिधी ।
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार गेल्या अडीच वर्षापासून प्रभारीच्याच हातात असून प्रभारीची परंपरा आजमितीसही कायम आहे. येथील गटशिक्षणाधिकारीपदी श्रीधर शिगवण गेल्या अडीच वर्षापासून प्रभारी म्हणून काम पहात आहेत. मात्र कायमस्वामी गटशिक्षणाधिकार्यांसाठी कुठल्याच प्रकारच्या हालचाली होत नसल्याने आर्चश्य व्यक्त होत आहे. तालुक्यात 345 प्राथमिक शाळा असून 900 हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांवर देखरेख ठेऊन शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तालुका शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र गटशिक्षणाधिकार्यांचा कारभार प्रभारींच्या हातात असल्याने काहीवेळा धोरणात्मक निर्णय घेताना अडचणी येत आहेत. पंचायत समितीच्या शिक्षण विभागात अनेक वर्षापासून प्रभारीचा सिलसिला कायम होता. मंगला व्हावळ यांची कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला होता. तीन वर्षानंतर त्यांची अन्यत्र बदली झाल्याने प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला. तालुका पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदी श्रीधर शिगवण यांची नियुक्ती करण्यात आली. तालुक्यात 315 शाळा असता देखील दैनंदिन पंचायत समितीत चार खात्यांचा भार प्रभारींकडेच सोपवण्यात आला आहे. पंचायत समितीच्या तालुका शिक्षण विभागासह जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प,तालुका कृषी रोपवाटिका आदी खात्यांचा समावेश आहे. कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकार्यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. मात्र तालुका शिक्षण विभागाला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकार्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून उदासिनता का दाखवली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा शिक्षण विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकार्यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.