क्रीडा संकुलाचा खेळखंडोबा

माणगावमधील संकुलाची जागा अद्याप ओसाड, खेळाडूंची निराशा; शासनाचे दुर्लक्ष


| माणगाव |सलीम शेख |

कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर या पाच जिल्ह्यांतील खेळाडू विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावत आहेत. या उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी माणगाव तालुक्यात कोकण विभागाचे मध्यवर्ती क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यासाठी जागा निश्चित करुन त्याची पाहणी तत्कालीन मंत्र्यांनी केली होती. या घटनेला चार वर्षांचा कालावधी लोटला असून, अद्याप या मैदानावरील एक दगडही हलला नसून, आजही ते ओसाड आहे. शासनाच्या दुर्लक्षपणाचा फटका तरुण खेळाडूंना बसत असून, त्यांची निराशा झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण असून, दिवसेंदिवस माणगावचे महत्त्व वाढत आहे. माणगाव याठिकाणी सर्व सुविधांसह प्रशस्त जागेत सुमारे 10 हेक्टर जागेवर कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. क्रीडा संकुल ज्या ठिकाणी होणार आहे, त्याठिकाणच्या जागेची पाहणी ठाकरे सरकारच्या काळात ना. आदिती तटकरे यांनी 3 फेब्रुवारी 2020 रोजी पाहणी केली होती. या पाहणीला तब्बल चार वर्षे झाली. मात्र, अद्यापही या जागेवर शासनाने क्रीडा संकुल उभारणीचे काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे कोकण विभागातील तरुण खेळाडूपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. माणगावातील 45 कोटींच्या भव्य क्रीडांगणाची घोषणा सरकारने केली होती. ती घोषणा आजही तरुण खेळाडूंपुढे आश्वासित करीत आहे. त्यामुळे तरुण खेळाडूंपुढे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारणीचे पुढचे पाऊल शासन कधी टाकणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

माणगाव विभागीय क्रीडा संकुलासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही महामार्गालगत असल्याने कोकणातील पाचही जिल्ह्यांतील तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या खेळाडूंसाठी हे ठिकाण सोयीचे आहे. या क्रीडासंकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या विभागीय क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करताना आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. कोकणातील शालेय व तरुण खेळाडूंना विभागीय क्रीडासंकुल प्रेरणादायी ठरणार आहे.

कामाला अद्याप नाहीच
या क्रीडा संकुलबाबत सप्टेंबर 2023 महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत माणगाव येथे कोकण विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करा, असे श्री. पवार यांनी निर्देश दिले होते. मात्र, तब्बल चार महिने लोटले तरीही कामाला सुरूवात नाही. या बैठकीला महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खा. सुनील तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-1) असीम कुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-2) के. गोविंदराज, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

या क्रीडा संकुलातून ग्रामीण भागातील विविध खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यास प्रोत्साहन मिळेल. कोकण विभागीय क्रीडासंकुल कोकणातील तरुणांसाठी अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षकांकडून तरुण खेळाडूंना शिकण्याची संधी मिळेल. यासाठी शासनाने लवकर क्रीडासंकुल उभारावे.

विजय मेथा, सामाजिक कार्यकर्ते, माणगाव

क्रीडा संकुल ग्रामीण भागातील खेळाडूंना महत्त्वाचे व्यासपीठ आहे. इथून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडेल. या क्रीडा संकुलात दर्जेदार खेळाचे प्रशिक्षण मिळणार असून सर्व प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्याचे व कोकणचे नाव देशपातळीवर पोहोचणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

भारत ढाकवळ, अष्टपैलू क्रिकेटर, माणगाव

तरुणांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी क्रीडा संकुल आवश्यक आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली शेतामध्ये विविध खेळ खेळताना दिसतात. असोशिएशन, प्रीमियर लीगच्या माध्यमातून याठिकाणी स्पर्धांचे आयोजन केले जाते. परंतु माणगावसारख्या ठिकाणी तरुणांना हक्काचे क्रीडा संकुल नसल्याने त्यांची निराशा होत आहे.

राहुल दसवते, संस्थापक, एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोशिएशन, माणगाव
Exit mobile version