भाजपचे नगरसेवक आणि मुख्याधिकारी आमने सामने
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
खोपोली नगरपरिषदेच्या प्रशासकीय काळात विकास कामांच्या नावाखाली 100 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक सानिया शेख यांनी केला आहे. मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी त्यांच्या आरोपांचे खंडन केले असून, बदनामीकारक व खोटे आरोप असल्याचा दावा त्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खोपोलीतील 100 कोटीचा घोटाळाप्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, भाजपच्या नगरसेविका आणि मुख्याधिकारी आता आमने सामने आले आहेत. यामध्ये कोण जिंकणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली नगरपरिषदेवर गेली अनेक वर्षापासून प्रशासकीय राजवट होती. निवडणुका न झाल्याने मुख्याधिकारी पंकज पाटील प्रशासकीय अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते. मागील दहा महिन्यापूर्वी नगरपरिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपच्या सानिया शेख या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांनी निवडून आल्यावर नगरपरिषदेच्या प्रशासकीय काळातील कामांची माहिती घेतली. कागदोपत्री माहिती गोळा केली. या काळात गार्डन सुशोभीकरण आदीसह विविध विकास कामांवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये तब्बल शंभर कोटींचा घोटाळा विकास कामांच्या नावाखाली झाल्याचा आरोप शेख यांनी केला. या आरोपामुळे खोपोलीमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपच्या नगरसेविकांच्या या आक्रमक भूमिकेला मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे. त्यांनी हे आरोप खोटे व बदनामीकारक असल्याचा दावा केला आहे. प्रशासकीय कारकिर्दीत शंभर कोटीची बिले अदा झाली नाहीत. अर्धवट माहितीच्या अधारे नगरपरिषदेची बदनामी केली आहे. त्यामुळे मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. भाजपच्या नगरसेविका सानिया शेख आणि मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्यामधील वाद आता पेटला असून यामध्ये काय सत्य समोर येईल, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. याबाबत मुख्याधिकारी पंकज पाटील, नगरसेविका सानिया शेख यांच्याशी संपर्क साधला, मात्र होऊ शकला नाही.







