चार तासात लावला अपहरणाचा छडा

खांदेश्‍वर पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी
। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 अंतर्गत खांदेश्‍वर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील विचुंबे गावातील विनय सिंग यांच्या सहा वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. सोबत त्यांची भाची देखील होती. दि.23 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल झाल्यानंतर खांदेश्‍वर पोलिसांनी अवघ्या चार तासात अत्यंत उत्तम तपास कौशल्याचे प्रमाण देत आरोपींना अटक केली.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, विचुंबे येथे राहणारे विनय गामा सिंग व त्यांच्या पत्नी पिंकी सिंग यांनी दि.23 तारखेच्या रात्री सहा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पिंकी सिंग यांना त्यांच्या मोबाईल वरती एका अज्ञात इसमाने त्यांची भाची व त्यांचा मुलगा त्याच्या कब्जात असून दहा लाख रुपये दिले नाही तर त्यांना ठार मारू अशा स्वरुपाची धमकी पाठविली होती. आरोपीने सदर धमकी एसएमएसच्या माध्यमातून दिली होती. त्यामुळे खांदेश्‍वर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे यांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. देविदास सोनवणे यांनी तातडीने तीन टीम बनवून त्यांना छत्रपती शिवाजी टर्मिनस, बांद्रा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाऊन तपास करण्याचे आदेश दिले. अखेरीस खांदेश्‍वर पोलीस टीमने बांद्रा येथे दोन्ही मुलांना शोधण्यात यश प्राप्त केले परंतु पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी मात्र पळून गेला. अपहरण झालेल्या दोन्ही मुलांकडे चौकशी करता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अवघ्या दोन तासात विपिन हिरालाल अग्रहरी याला ताब्यात घेतले. आधीक चौकशीअंती एका क्लिष्ट अपहरण नाट्या वरचा पडदा उठला. तक्रारदार विनय सिंग यांच्या सहा वर्षीय मुलाचे अपहरण त्यांच्याच भाचीने केले होते. मनिषा आणि विपिन हिरालाल अग्रहरी यांना अटक करण्यात आले असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Exit mobile version