| पुणे | वृत्तसंस्था |
पुण्यामध्ये शिकत असलेल्या तरुणीचा तिच्याच मित्रांनी नऊ लाखांच्या खंडणीसाठी खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची लातूरची असलेली भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय 22) वाघोलीतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. 30 मार्चच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास ती विमाननगरमधील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाली होती. दरम्यान मुलींसोबत संपर्क होत नसल्याने तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय 49) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. याच कालावधीत तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेजही आला. नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती.
तर पोलिसांनी याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली आहे. तीनही आरोपी मयत तरुणीचे मित्र आहे. 30 मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले आणि खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जात असून पुणे पोलीस अधिक तपास करत आहे.