किहिम घटनाः चिमुकल्यांचा जन्मदात्या आईनेच कोंडला श्वास

| अलिबाग | प्रमोद जाधव |

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकरांचा गळा दाबून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील किहिम येथे घडली. पोटचं लेकरु म्हणजे आईच्या काळजाचा तुकडा. लेकराला साधं खरचटलं तरी आईच्या काळजाता धस्स होते. मात्र, जन्मदात्या आईनेच पोटच्या एक नाही तर दोन्ही लेकरांचा रविवारी (दि.31 मार्च) जीव घेतला. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी आरोपी महिलेला सोमवारी (दि.8) सायंकाळी ताब्यात घेतले. शितल सदानंद पोले (25) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

अनैतिक संबंधात ही दोन्ही मुले अडथळा ठरत होती. यामुळे प्रियकरासाठी आईने पोटच्या मुलांनाच संपवलं. आईच्या कृत्याने केवळ अलिबागच नाही तर संपूर्ण रायगड जिल्हा हादरुन गेला. अवघ्या पाच वर्षाची आराध्या सदानंद पोले व तीन वर्षाचा सार्थक सदानंद पोले यांची जन्मदाती आईच त्यांची कर्दनकाळ ठरेल, याची कल्पनाही त्या चिमुकल्यांना कधी केली नसेल. आईवर मोठ्या विश्वासाने बागडणाऱ्या त्या चिमुकल्यांना केवळ प्रियकरासाठी तिने ठार मारले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शितल पोले हिचे गावाकडील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिला त्याच्यासोबत संसार थाटायचा होता. मात्र, ही दोन्ही मुले अडथळा ठरत होती. प्रियकराला मुले नको होती. अशातच मुलगी आराध्या आई सतत फोनवर बोलत असल्याचे वडिलांना सांगत होती. अखेर शितलने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दोन्ही मुलांच्या नाकातोंडावर गमजा बांधून तसेच हाताने तोंड दाबून त्यांचा श्वास कोंडला. तिने मोठ्या शिताफिने मुले झोपेतच बेशुद्ध झाल्याचा कांगावा केला.

या बालकांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाल्याने त्यांचा विसेरा आणि शवविच्छेदन करुन सोमवार, दि. 1 एप्रिल करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले. या मुलांच्या पार्थिवावर अंतिम विधी करण्यासाठी त्यांचे नातेवाईक त्यांच्या मूळगावी पुसद-यवतमाळ येथे घेऊन गेले. पोलीस कसून तपास करीत होते. अखेर एक धागा सापडला आणि पोलीस चिमुकल्यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बी.बी.खाडे यांनी आरोपीला पकडण्यात मोलाची कामगिरी केली.

Exit mobile version