| मुंबई | प्रतिनिधी |
आंदोलकांवरील गुन्हे काढू असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. तर गृहखातं सांभाळणारे फडणवीस काही तरी वेगळं सांगत आहेत. यांच्या श्रेयवादात आमचा ओबीसीचा बळी जातोय. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल, तर या राज्यातील ओबीसींना विष द्या आणि मारून टाका, असा संताप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने निर्णय घेताना इतरांच्या हिताचा विचार केला नाही. हे आमचं दुर्दैव आहे, अशी खंतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला आहे. त्याचे भविष्यात परिणाम होणार आहेत. या अध्यादेशामुळे ओबीसी धास्तावला आहे. आमच्या हक्काचं संरक्षण होणार की नाही? सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं हा प्रश्न आहे. मराठा समाजाचा सर्व्हे करुन अहवाल मागवला होता. शिंदे समितीचाही अहवाल आलेला नाही. कॅबिनेट पुढे हा निर्णय झाला नाही. मंत्रिमंडळाची परवानगी न घेता हा जीआर काढला. सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला. श्रेयवादाच्या लढाईसाठी हे सर्व झालंय. ओबीसी कमजोर आहे म्हणून निर्णय घेतला का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आरक्षण संपवण्याची सुपारी ओबीसींना कसंही वागवलं तरी ते काही करू शकणार नाहीत, अशी भावना मुख्यमंत्र्यांची झाली असेल. मंत्रिमंडळाचा विचार न घेता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. आरक्षण संपवण्याची सुपारी शिंदे सरकारने घेतली आहे. ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी या सरकारने पहिल पाऊल टाकलं आहे. 90 टक्के लोकांना 50 टक्के आरक्षणामध्ये ठेवायचं आहे. ओबीसींचे संवैधानिक हक्क हिरावून घेणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, असा आरोप त्यांनी केला.