चाकू भोसकून तरुणाची हत्या; दोघेजण गजाआड

| पनवेल | वार्ताहर |

कामोठे गावात राहणाऱ्या दोघा तरुणांनी किरकोळ कारणावरून बेकरीत काम करणाऱ्या विशाल मौर्या या १७ वर्षीय तरुणाच्या पाठीत चाकू खुपसून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रवींद्र राजेश अटवाल उर्फ हरीयाणी (२२) व राज शैलेश वाल्मिकी (१९) अशी हत्या करणाऱ्या तरुणांची नावे असून, कामोठे पोलिसांनी दोघांना हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

विशाल मौर्या हा तरुण कामोठे सेक्टर १४ मधील सूरज बेकरीमध्ये काम करून त्याच ठिकाणी राहत होता. काम संपल्यानंतर तो पान शॉपवर जात होता. यावेळी त्याच पान शॉपवर रविंद्र हरीयाणी आणि राज वाल्मीकी हे दोघेही दारू पिऊन पान खाण्यासाठी गेले होते. यावेळी विशालचा त्या दोघांना धक्का लागल्याचे निमित्त झाले. याच कारणावरून दोघांनी विशालसोबत भांडण काढले आणि त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पान शॉप चालक सलमान खानने त्या दोघांच्या तावडीतून विशालला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र राज याने त्याच्या जवळ असलेला चाकू विशालच्या पाठीमध्ये भोसकून त्या ठिकाणावरून पलायन केले.

या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी होऊन खाली पडल्याने त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विशालची हत्या करणाऱ्या आरोपी रविंद्र हरीयाणी आणि राज वाल्मिकी या दोघांची माहिती मिळविली.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ व त्यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना कामोठे परिसरातून अटक केली.

Exit mobile version