मार्केट यार्डमध्ये चिखलाचे साम्राज्य; शेतकरी, ग्राहकांचे हाल

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरातील आणि परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांना एका जागी व्यवसाय करता यावेत, यासाठी कर्जत दहिवली येथील मार्केट यार्डच्या मैदानात भाजीपाला आठवडा बाजार सुरु झाला होता. त्या ठिकाणी स्थानिक शेतकरी हे भाजीपाला घेऊन येतात आणि त्याची विक्री करतात. मात्र, त्या भाजीपाला मार्केटमधील स्वच्छता राखण्याचे काम ना कर्जत नगरपरिषद ठेवत, ना कृषी उत्पन्न बाजार समिती, असा आरोप स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्या कल्पना दास्ताने यांनी केला आहे.

कर्जत शहरात भाजीपाल्याचा आठवडा बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दहिवली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सुरु करण्यात आला. त्यावेळी मार्केट यार्ड येथे भाजी विक्रीचा आठवडा बाजार दर शनिवारी भरवला जाऊ लागला. त्यात शेतकर्‍यांच्या मालाला स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांना बाजारपेठ उभी करून दिली. त्यानंतर कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी हा दररोज टोपलीमध्ये ताजा भाजीपाला घेऊन येऊ लागला आणि अर्ध्या दिवसात तो विकून घरी परतु लागला होता. ग्राहकालादेखील ताजा आणि गावठी भाजीपाला मिळू लागल्याने शेतकरी आपला शेतातील भाजीपाला घेऊन येऊ लागले आणि त्याची विक्री रोजच्या रोज करू लागले. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची आणि विक्रीसाठी शेतकर्‍यांची गर्दी होत आहे.

मात्र भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी ज्या ठिकाणी बसतात, तेथेच सायंकाळी घरी परत जात असताना शिल्लक माल टाकून दिला जातो आणि त्यामुळे तो कचरा बनून तेथे दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यात काही माल अनेक दिवस तेथेच राहून सडून गेल्याने भाजीपाला खरेदी करणारे यांनादेखील चिखलातून वाट काढावी लागते. त्याबद्दल स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्या कल्पना दास्ताने यांनी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देऊन कचरा काढण्याची मागणी केली आहे. तर त्यांनी स्वतः संबंधित भाजी विक्रेते यांना तेथून घरी परतत असताना सर्व शिल्लक माल हा एकाच ठिकाणी साठवून ठेवण्याची सूचना केली आहे. तो कचरा कर्जत नगरपरिषदेच्या घंटा गाडीमधून दररोज संकलित करण्याच्या सूचना आपण पालिकेला देऊ, असे आश्‍वासन भाजीपाला विक्रेते यांना केले आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्याकडून कर संकलन करीत असेल तर त्यांनीदेखील कचरा उचलून नेण्याची कार्यवाही करायला हवी, असे मतदेखील दास्ताने यांनी मांडले आहे.


पावसाळ्यामध्ये तेथून जाणेसुद्धा अशक्य होते. कारण, तेथे गटारापेक्षाही प्रचंड घाण, दुर्गंधी, चिखल असतो आणि त्याच ठिकाणी रोज लागणारा भाजीपाला विकला जातो. जनतेच्या आरोग्याशी हा खेळ आहे. भाजी विक्रेतेसुद्धा आपल्या जिवावर उदार होऊन त्या दुर्गंधीत, चिखलात, दिवसभर पावसात नाईलाजाने व्यवसाय करतात. – कल्पना दास्ताने, स्थानिक रहिवासी

Exit mobile version