| अलिबाग | प्रतिनिधी |
मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीचे सदस्य संदेश शांताराम पाटील यांचे सुपुत्र किरण संदेश पाटील यांनी हिंदी सोनी वाहिनीवरील कौन बनेगा करोडपती? या कार्यक्रमात आपल्या बुद्धिकौशल्याचा ठसा उमटवित 6 लाख 40 हजाराच्या बक्षिसावर शिक्कामोर्तब केला. या स्पर्धेत सहभागी होणारे जिल्ह्यातील पहिले स्पर्धक ठरले आहेत. त्यामुळे पोयनाड पंचक्रोशीतूनच नव्हे तर अलिबाग तालुक्यातून आणि संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
किरण हा उच्चशिक्षित असून मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण करुन युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत. सध्या ते पोस्टाच्या कुसुंबळे शाखेचे पोस्टमास्तर म्हणून काम पहात आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेकदा फोन करून या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाचा पहिला भाग सोमवार, दि.9 आणि दुसरा भाग मंगळवार, दि.10 रोजी सोनी वाहिनीवर रात्री 9 वाजता सादर झाला. याप्रसंगी त्यांनी आपल्या आई-वडिलांनी उत्तेजन दिल्यामुळेच आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो, त्यामुळे मिळालेली रक्कम त्यांना समर्पित करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमातील यशाबद्दल मॉर्निंग वॉक ग्रुप आंबेपूर-पेझारीचे अध्यक्ष, प्रकाश म्हात्रे आणि इतर पदाधिकारी, सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कौन बनेगा करोडपतीमध्ये पेझारीचा किरण पाटील
