| पेण | प्रतिनिधी |
पेण अर्बन बँक बुडून आता एक तप झाले. या काळात कधीही ठेविदारांसाठी न लढणार्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना अचानकपणे ठेविदारांचा पुळका आल्याचे दिसत आहे. यासाठी ते रविवारी(दि.13) पेणच्या दौर्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा राजकीय हेतुने प्रेरित असल्याची चर्चा शहरात होत आहे.
बारा वर्षात सोमय्या यांना पेण अर्बन बँक आठविली नाही ती आत्ताच का आठवली? अशी चर्चा पेण मध्ये जोर धरत आहे. पेण अर्बन बॅक 2010 ला बुडीत निघाली आणि रायगडसह मुंबईत हाहाकार माजला. सहकार क्षेत्राला मोठा हादरा बसला. त्यावेळी तत्कालीन आमदार धैर्यशील पाटील वगळता पेण येथील स्थानिक नेत्यांनी अर्बन बॅक संचालक मंडळाला मदत केली. मात्र धैर्यशील पाटील हे ठेविदार आणि खातेदारांच्या बरोबर ठाम उभे राहिले. त्यांच्या समवेत नरेंद्र जाधव ही होते. परंतु अर्बन बॅकेच्या संचालक मंडळाला गुप्तपणे मदत करण्याचे काम माजी मंत्री रविशेठ पाटील आणि त्यांच्या सुपुत्रांनी केले. त्यामुळे अर्बन बॅकेंच्या संचालकांनी खातेदार ठेविदारांचा विचार न करता स्वतःची कातडी वाचवण्याचे काम केले.
तत्कालीन सहकार मंत्री व मुख्यमंत्री यांची देखील भेट रविशेठ पाटील यांनी शिशिर धारकर व त्यांच्या संचालक मंडळाची घडवून दिली. सहकार क्षेत्रात हाहाकार माजलेला असताना ठेविदार व खातेदारांच्या मागे कुणी ही राजकीय मंडळी उभी राहिली नाही. अर्बन बॅक बुडीत निघाल्या नंतरच्या काळात आगामी येणारी नगरपालिकेची निवडणुक ही तिसरी निवडणूक आहे, दरवेळेला अर्बन बॅक आर्थिक घोटाळयाचा मुद्दा पुढे करून नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचे काम राजकीय मंडळीनी केला आहे. 2011 च्या निवडणुकीत शिशिर धारकर आणि त्यांच्या बगलबच्यांनी रविशेठ पाटील यांच्या कॉग्रेस ला मदत केली. त्या नंतर 2016 च्या निवडणूकीत शिशिर धारकर गटात दोन भाग पडले मात्र शिशिर धारकर यांनी पुन्हा कॉग्रेसलाच मदत केली. दोन्ही वेळेला सत्ता काँग्रेस आली. मात्र अगामी येणार्या निवडणूकीमध्ये शिशिर धारकर हे आमदार तथा मा.मंत्री रविशेठ पाटील यांच्या विरोधात शंडू ठोकून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अर्बन बॅक प्रकरण पेणकरांच्या माथी मारून अगामी येणार्या निवडणुकीमध्ये मतांचा जोगवा मागीतला जाईल एवढ नक्की.
आमदार रविशेठ पाटील हे सध्या भाजप चे आमदार आहेत, त्यामुळे किरीट सोमय्या हे त्यांना तारण्यासाठीच अर्बन बॅक मुद्दा हाताळणार अशी चर्चा ही सुरू आहे. गेल्या 12 वर्षात किरीट सोमय्या यांना एकदाही असे वाटले नाही की अर्बन बॅक घोटाळा झाला आहे. त्या बॅकेला भेट दयावी. त्या बॅकेच्या ठेविदार खातेदारांना मदत करावी. मात्र अचानकच पेण अर्बन बँकेला किरीट सोमैया भेट देत आहेत त्यामूळे पेण मध्ये चर्चेचा धूरळा उडला आहे.
किरीट सोमय्या पेणमध्ये येवून पेण अर्बंन बँकेवर बोलणार हे निश्चित. परंतु पेण अर्बन बँकेचे अध्यक्ष शिशिर धारकर यांचे चिरंजीव नजिकच्या काळात भाजपमध्ये प्रवेश करण्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मिहीर धारकर यांचे मामा समीर मेघे हे भाजपचे आमदार असून आपल्या भाच्याची राजकीय कारकिर्द स्थिर करण्यासाठी मेघे पिता पुत्र भाजप हायकमांड कडे शब्द टाकून आरक्षण मनायोग्य पडल्यास नगराध्यक्षांचे तिकिट निश्चित करणार असल्याची देखील चर्चा आहे. असं झााल्यास जर उद्या किरीट सोमैया यांनी अर्बंन बँकेच्या संदर्भात धारकर अॅन्ड कंपनीच्या विरूध्द वक्तव्य केल्यास पुन्हा रायगडसह महाराष्ट्राला हेच पाहयला मिळेल का, की ज्यांच्या ज्यांच्या विरूध्द किरीट सोमैया यांनी वक्तव्य केले त्यांनी त्यांनी भाजपच्या वॉशिंग मशिन मध्ये स्वतःला धूवुन घेतले. धारकरांनी जर नजीकच्या काळात भाजपच्या वॉशिंग मशिन मध्ये स्वतःला धूतले तर सोमैया काय करणार? असो. जर तरच्या बाबींचा सध्या तरी विचार करू नये. परंतु एवढे निश्चित किरीट सोमैया स्वतःहुन न येता त्यांना अर्बन बँक संदर्भात बोलण्यासाठी बोलावणे केले आहे. धारकरांच्या बरोबर किरीट सोमैया ज्यांनी धारकरांना मदत केली त्यांच्या विरूध्द बोलतील का? अशीही पेणकर सध्या चर्चा करत आहेत. मात्र उदया किरीट सोमैया पेणमध्ये येवून काय बोलतील हे येणारा काळच ठरवेल.