पुनरागमनासाठी किशनची धडपड

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक ‘बुची बाबू चषक’ ही स्पर्धा 15 ऑगस्टपासून तामिळनाडूमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव, इशान किशन असे काही मोठे स्टारही खेळताना दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इशान किशनकडे झारखंडचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. इशान यापूर्वी झारखंड संघाचा भाग नव्हता, पण तो आता बुधवारी संघाशी जोडला जाणार आहे.

याआधी इशानला मार्च महिन्यात बीसीसीआयने मोठा धक्का दिला होता. क्रिकेट खेळत नसताना देशांतर्गत क्रिकेट खेळायला नकार दिल्याने त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. त्याने रणजी चषक सामने झारखंडसाठी खेळले नव्हते. तसेच, त्याला या वर्षात भारतीय संघातही स्थान मिळालेले नाही. यानंतर आता सप्टेंबरपासून बीसीसीयच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे पुन्हा राज्य संघात येण्यासाठी आणि भारतीय संघातील पुनरागमनाच्या दृष्टीनेही इशानसाठी आता ही ‘बुची बाबू चषक’ स्पर्धा महत्त्वाची आहे.

Exit mobile version