| नागोठणे | प्रतिनिधी |
विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदार संघासाठी नागोठण्याचे सुपुत्र, शिवसेना (उबाठा) चे जिल्हा सहसंपर्क प्रमुख व नागोठण्यातील नावाजलेल्या भारतीय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज बुधवारी(दि.7) दाखल केला आहे. कोकण भवन येथे रायगडसह संपूर्ण कोकणातून केवळ एका मेसेजवर मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने किशोरभाई जैन हे भाजपाचे उमेदवार व विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करणार असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी नागोठण्याचे माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, माजी उपसरपंच सुरेश जैन, शाखाप्रमुख धनंजय जगताप, संपर्क प्रमुख अनिल महाडिक, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, शैलेश रावकर, किर्तीकुमार कळस, माजी ग्रा.पं. सदस्या भक्ती जाधव आदींसह नागोठण्यातील कार्यकर्तेही यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या तत्वाने काम करतांना किशोरभाई जैन यांनी आजपर्यंत राजकारण, समाजकारण, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता स्थापन करुन रोल मॉडेल नागोठणेचा विषय असो की, विभागातील विकास कामे असोत अथवा आपल्या भारतीय एज्युकेशन सोसायटीमार्फत केजी टू पीजी पर्यंतचा शैक्षणिक सुविधा मिळवून देतांना शिक्षण सम्राट म्हणून त्यांचे कार्य असो, किशोरभाई जैन यांनी सर्वच बाबतीत उल्लेखनीय कार्य केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी त्यांनी नेहमीच शिरस्तावर माणून कार्य केले आहे. यातूनच विधानसभेची निवडणूक लढविल्याचा अनुभव पाठीशी असलेले व संपूर्ण कोकणात दांडगा संपर्क असलेले किशोरभाई जैन कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही ख-या अर्थाने रंगत आणतील, असे बोलले जात आहे.







