किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

महाराष्ट्राच्या मुली बाद फेरीत

। मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्राने ’33व्या किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेतील शेवटच्या साखळी लढतीत ओरिसाचा 59-19 असा पराभव करीत बाद फेरी गाठली. उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राची गाठ आता गत स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या उत्तर प्रदेश संघाशी पडेल.

पटना, बिहार येथील पाटली पुत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील ‘फ’ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत चौथ्या मिनिटाला लोण देत 10-00 अशी आघाडी घेतली. सलग 15 गुण गमविल्यानंतर ओरिसाने मोनिका पवारची अव्वल पकड करीत आपले गुणांचे खाते उघडले. पण महाराष्ट्राने पुन्हा दुसरा लोण देत आपली आघाडी 21-03 अशी वाढविली. मध्यांतराला महाराष्ट्राकडे 30-10 अशी आघाडी होती.

उत्तरार्धात आणखी दोन लोण देत महाराष्ट्राने गुणांचे अर्धशतक पार केले. बिंदिसा सोनार, मोनिका पवार यांच्या झंझावाती चढाया त्याला उजवा कोपरा रक्षक साक्षी जाधवची मिळालेली पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला.

इतर निकाल संक्षिप्त :-
1)'ह' गट हिमाचल प्रदेश वि. मध्य प्रदेश (34-28)
2)'अ' गट हरियाणा वि. भारतीय क्रीडा प्राधिकरण-साई (31-13)
3) 'क' गट उत्तर प्रदेश वि. आसाम (36-18),
4) 'फ' गट उत्तरांचल वि. कर्नाटक (49-28).
Exit mobile version