महाराष्ट्राच्या मुली उप उपांत्यपूर्व फेरीत गारद
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या मुलींचे आव्हान उप उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. हरियाणा, गोवा, उत्तराखंड, राजस्थान उपांत्य फेरीत धडक दिली. हरियाणा विरुद्ध गोवा, तर उत्तराखंड विरुद्ध राजस्थान अशा उपांत्य लढती होतील. पटणा येथील पाटली पुत्र क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या 33 व्या किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला उप उपांत्यपूर्व फेरीतच उत्तर प्रदेशने 59-28 असे लीलया नमवित आपली घोडदौड सुरू ठेवली. महाराष्ट्राने सुरुवात तर झोकात केली. महाराष्ट्राची कप्तान बिंदिसा सोनारने सामन्याच्या पहिल्याच चढाईत बोनस गुण घेत खाते खोलले. काही वेळातच 5 गुणांची आघाडी देखील घेतली. पण ती त्यांना टिकविता आली नाही. या पिछाडीवरून खचून न जाता उत्तर प्रदर्शने आपला खेळ गतिमान करीत महाराष्ट्रावर पहिला लोण देत 15-13अशी नाममात्र आघाडी घेतली.
पुन्हा खेळाची गती कायम राखत दुसरा लोण देत यू.पी. ने आपली आघाडी 25-17 अशी वाढविली. विश्रांतीला 26-17 अशी यू.पी. कडे आघाडी होती. उत्तरार्धात देखील खेळाचा जोश कायम राखत आणखी तीन लोण महाराष्ट्रावर देत उत्तर प्रदेशने गुणांचे अर्धशतक पार केले. पहिली 5 मिनिटे वगळता पूर्ण डावात महाराष्ट्राचा प्रतिकार जाणवला नाही. पहिला लोण घेतल्यानंतर महाराष्ट्र संघाचा संयम सुटला. त्यांनी झटपट गुण मिळविण्याच्या नादात गुण गमविले. गुणांची पिछाडी वाढत गेल्याने ते गांगरूण गेले. उत्तर प्रदेशच्या ज्योती व हिमांशी यांना रोखणे महाराष्ट्राला कठीण जात होते. तर उत्तर प्रदेशचा बचाव भेदने महाराष्ट्राला कठीण जात होते. त्यामुळेच महाराष्ट्राला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीला बिंदीसा सोनार, मोनिका पवार यांनी चांगली चमक दाखविली. नंतर मात्र त्या ढेपाळल्या. रात्री उशीरा झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हरियाणाने पंजाबला 64-19 असे, गोव्याने उत्तर प्रदेशला 51-33 असे, राजस्थानने छत्तीसगडला 49-15 असे, तर उत्तराखंडने तामिळनाडूला 41-40 असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली.