पेणमध्ये महिलांच्या आत्मभानासाठी पतंगोत्सव

| पेण | प्रतिनिधी |

निर्धार माझा हिंसा सहन न करण्याचा.. निर्धार माझा धर्मांधतेच्या विरोधी लढण्याचा.. निर्धार माझा स्वावलंबी बनण्याचा… असे म्हणत पेणमधील आदिवासी, कष्टकरी, मोलकरणी व कुमारवयीन मुलींचे रंगीबेरंगी इको फ्रेंडली पतंग आकाशात भिरभिरले. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचारविरोधी मंचांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


गेल्या महिनाभरापासून अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचारविरोधी मंचमार्फत ‌‘निर्धार माझा’ हे अभियान सुरू होते. या अभियानांतर्गत अनेक कार्यशाळा, जनजागरण सत्र घेण्यात आले होते. या अभियानाची सांगता प्लास्टिकऐवजी कागदी पतंग, मांज्याऐवजी सुती दोरा, पतंगाची कापाकापाऐवजी एकमेकास सहकार्य या आगळ्यावेगळ्या तत्त्वावर पतंगोत्सव साजरा करीत करण्यात आली. या उत्सवात पाचशेपेक्षा जास्त तरूण मुली व कष्टकरी महिलांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी, महात्मा गांधीनगरपासून, तर पेण नगरपरिषदेपासून मैदानापर्यंत हातात रंगीबेरंगी पतंग घेऊन, जनजागृतीपर घोषफलक हातात नाचवत महिलांनी अतिशय उत्साहात रॅली काढली. या रॅलीची सांगता झाल्यावर नगरपालिकेच्या मैदानावर आदिवासी मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.


या कार्यक्रमात पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या शिक्षणाधिकारी ज्योती वाघ यांनी सुंदर गाणे म्हणत किशोरवयीन मुलींच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळेस ढवळे ट्रस्ट, पालघर येथील आरोग्य सेविका, डॉक्टर, पतंगराव कदम महाविद्यालय प्राध्यापिका, विद्यार्थिनी, शासकीय वसतिगृह, पेण व आश्रम शाळा सावरसई, आई डे केअर, चाईल्ड हेवन, निसर्ग योगा क्लब सदस्य आदींनी अंकुर ट्रस्टच्या आदिवासी, अनाथ, स्पेशल व किशोरवयीन मुलींसोबत पतंग उडविण्याचा निकोप आनंद घेतला. यावेळेस मंचाच्या सदस्या शैला धामणकर, कविता पाटील, डॉ. नीता कदम, दिपश्री पोटफोडे, ॲड. वैशाली कांबळे, संयोगिता टेमघरे, कैसर मुजावर, ॲड. मंगेश नेने आदी उपस्थित होते.

हा पतंगोत्सव केवळ उत्सव नसून, महिलांच्या आत्मभानाची चळवळ आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर सुरू झालेल्या या महिला मंचात आता तरुणींचे सामूहिक नेतृत्व पुढे येत आहे. यामध्ये शाळकरी मुला-मुलींचे प्रबोधन करण्यात येत असून, महिला व ट्रान्सजेंडर यांच्या सार्वजनिकरित्या व्यक्त होण्याच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

डॉ. वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या
Exit mobile version