। पुणे । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल करण्यात आले. के.एल. राहूलला संघात स्थान देण्याबाबत प्रशिक्षक गौतम गंभीरने सकारत्मकता दाखवली होती, मात्र प्रत्यक्षात सामना सुरु झाल्यावर राहुल हा सहकार्यांसाठी पाणी आणताना दिसून आला.
मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना भारताच्या प्लेइंग इलेव्हनधून बाहेर करण्यात आले. त्यांच्या जागेवर आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर आणि शुभमन गिल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. दरम्यान, यातील केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले जाईल याबाबत गेल्या अनेक दिवसांपासूनच चर्चा होती. केएल राहुलची कामगिरी गेल्या काही दिवसात चांगली झाली नव्हती. बंगळुरूला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने 0 आणि 12 धावा केल्या होत्या.
आजपासून भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना. त्यातच पहिल्या सामन्यात शुभमन गिल दुखापतीमुळे खेळला नव्हता, तर सर्फराजने दुसर्या डावात दीडशतकी खेळी केली होती. त्यामुळे गिल दुसर्या सामन्यातून पुनरागमन करेल आणि सर्फराजही त्याची जागा कायम करेल, असेच चित्र दिसत होते. त्यामुळे केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधील जागा गमवावी लागेल, असे अंदाज अनेकांनी लावले होते. मात्र, या सामन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने या सर्व चर्चांना खोडून काढताना म्हटले, सोशल मिडिया प्लेइंग इलेव्हन इलेव्हन ठरवू शकत नाही. हो केएल राहुलला मोठ्या धावा करायच्या आहेत आणि आमचे संघव्यवस्थापन त्याला पाठिंबा देण्याचा विचार करत आहे. गंभीरने असे भाष्य केल्यानंतर मात्र केएल राहुल संघात कायम राहू शकतो, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली होती. परंतु, नाणेफेक न्यूझीलंडने जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने संघ घोषित केला, तेव्हा त्याने तीन बदल झाल्याचं सांगितलं. यानंतर सामना सुरू झाल्यावर ड्रिंक्स ब्रेकदरम्यान केएल राहुल मैदानात खेळाडूंसाठी पाणी आणतानाही दिसला.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये मॅट हेन्रीच्या जागेवर मिचेल सँटेनरला संधी दिली आहे







