। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
परिवहन सेवेत काम करीत असताना झालेल्या अपघातात जखमी झालेल्या चालकाच्या उपचाराचा खर्च महापालिका प्रशासनाने न केल्यास संबंधित कर्मचार्याच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र कर्मचारी युनियन करणार असल्याची माहिती कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिली.
कामगार नेते रविंद्र सावंत हे मोरोक्को येथे आयटीएफच्या जागतिक परिषदेसाठी गेले होते. नवी मुंबईतील कर्मचार्यांच्या समस्या, असुविधा याला जागतिक व्यासपिठावरुन वाचा फोडल्यावर आठ दिवसांनी भारतात आले असता त्यांनी मुंबई विमानतळावरुन घरी न जाता थेट वाशीतील प्रथम रुग्णालयात धाव घेत संबंधित कर्मचार्याची भेट घेतली. कर्मचार्यांना मेडीक्लेम नाही, आरोग्य सुविधा नाही, उपचाराचा खर्च दिला जात नाही, उपचारासाठी गैरहजर राहिल्यास वेतनातून कपात केली जाते. वारंवार पाठपुरावा करुनही पालिका प्रशासन कर्मचार्यांच्या आरोग्याबाबत, उपचाराबाबत उदासिनता दाखवित असल्याचा संताप व्यक्त करत महापालिकेने कर्मचार्यांना वार्यावर सोडले असल्याचा आरोप कामगार नेते रवींद्र सावंत यांनी यावेळी केला.
रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेत जखमी कर्मचार्याच्या प्रकृतीबाबत व उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. त्या ठिकाणहूनच परिवहन व्यवस्थापक यांना मोबाईल वर कॉल करून कामगार नेते रविंद्र सावंत यांनी डॉक्टरांशी बोलणी करून दिली. खर्चाची जबाबदारी परिवहन व्यवस्थापकांनी घेतली आहे. तथापि परिवहनने खर्च न केल्यास महाराष्ट्र कर्मचारी युनियन जखमी चालकाच्या उपचाराचा सर्व खर्च करेल, अशी माहिती कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी दिली.