| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
विराट कोहली हा भारतीय संघातील चिंतेचा विषय आहे, असे आपण कधी ऐकले नव्हते. मात्र यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघात विराट कोहलीची फलंदाजीची पद्धत हा चिंतेचा विषय म्हणून पाहिला जात आहे. भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांना भारताच्या टी-20 विश्वचषक जिंकण्याच्या वाटेत विराट आडवा येत असल्याचं जाणवत आहे.
विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात दोनवेळा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळवला आहे. नुकतेच त्याने आयपीएलमध्ये मोठा धमाका करत 741 धावा केल्या आहेत. मांजरेकर म्हणाले की, उपांत्य आणि अंतिम फेरी सारख्या मोठ्या सामन्यात एकच चिंता आहे विराट कोहली! विराट कोहली मोठ्या सामन्यात सर्व जबाबदारी स्वतःवर घेतो. तुम्हाला सर्व मोठ्या सामन्यात हे जाणवले असेल. अशा सामन्यात विराटला स्वतः खूप वेळ फलंदाजी करावी असे वाटत असते. त्याची इंडियन क्रिकेटमध्ये तशी प्रतिमा असल्याने तो ती आपलीच जबाबदारी आहे, असे समजून खेळतो. त्याने खूप वेळ टिकून फलंदाजी करण्यापेक्षा मुक्तपणे फलंदाजी करणे गरजेचे आहे. त्याने त्याच्या प्रतिमेची चिंता करू नये. आपण एकदिवसीय विश्वचषकात ते पाहिले आहे. त्यामुळे उपांत्य आणि अंतिम फेरी माझ्या दृष्टीने विराट कोहली हा चिंतेचा विषय आहे.