फडणवीसांच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा तडाखा

मेधा पाटकर यांचे परखड प्रतिपादन
। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
फडणवीसांच्या चुकीच्या निर्णयामुळे कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसल्याचे परखड प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा अभ्यासक मेधा पाटकर यांनी केले आहे. कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित वार्तालापप्रसंगी त्या बोलत होत्या.
मेधा पाटकर म्हणाल्या की, विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्याचे परिणाम कोल्हापुरातील जुन्या वस्त्यांनाही भोगावे लागले. गेल्या काही वर्षांत कोल्हापुरात रायगडमधील पुराची पुनरावृत्ती झाली. आलमट्टीची उंचीच नव्हे, तर बॅकवॉटरचा फटकाही कोल्हापूरला महापुरात बसतो. पाण्याची फूग, नदीच्या प्रवाहातील अडथळे या पुरासाठी कारणीभूत आहे. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचणे ही गोष्ट आता जुनी झाली आहे.
याशिवाय, जुन्या वस्तीत, जेथे यापूर्वी कधीही पुराचे पाणी शिरले नाही, तेथे नागरिकांना पुराच्या पाण्याला तोंड द्यावे लागले. त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. पंचनामे केले जातात; परंतु नुकसानभरपाई दिली जात नाही, तर त्यांना तुटपुंजे अनुदान दिले जाते. याबाबत पालकमंत्र्यांनी पुन्हा विचार करणे गरजेचे असल्याची सूचनाही त्यांनी केली.
तसेच, खरे तर जिल्ह्याच्या विकासासाठी नवी दिशा मांडताना जल, भूमी आणि वृक्ष संवर्धन या तिन्हींचा विचार करून अभ्यास झाला पाहिजे. निसर्गाचे नियम विचारात घ्या. राजकीय हस्तक्षेपामुळे उत्खनन आणि जंगलतोड होत आहे. नदीचा गाळ काढल्यामुळे नदीचा प्रवाह वाढेल, हा नेत्यांनी मांडलेला मुद्दा हास्यास्पद आहे. नदीच्या प्रवाहामुळे काढलेला गाळ काही काळातच भरून निघेल, अशी वस्तुस्थिती आहे. शहरात पुराच्या पाण्याला जमिनीत मुरायला वाव द्या. तोच तुमच्या विकासाचा रस्ता असेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी स्वागत केले. यावेळी सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर, विजय दिवाण, निसर्गमित्रचे कार्यवाह अनिल चौगुले, उदय कुलकर्णी, सारंग यादवाडकर, महेश शिवपुजे आदी उपस्थित होते.

Exit mobile version