स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात जंगी स्वागत
। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत पदकी निशाणा साधणारा भारतीय नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत क्रीडा जगतात भारताची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी त्याने करून दाखवली आहे. स्वप्निल कुसाळे याने महाराष्ट्राचा 72 वर्षांचा पदकी दुष्काळ संपुष्टात आणत नवा इतिहासही रचला आहे.
पॅरिसमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर मायदेशी परतल्यावर स्वप्निल पहिल्यांदाच आपल्या गावी आला आहे. ऑलिम्पिक चॅम्पिनयच्या आगमनामुळे कांबळवाडीतील आपल्या घरी पोहचण्याआधी कोल्हापुरात त्याच्या स्वागतासाठी कमालीचा उत्साह दिसून आला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ऑलिम्पिक चॅम्पियनच्या स्वागताची खास तयारी करण्यात आली होती. ‘कोल्हापुरी जगात भारी’ ही गोष्ट जगातील मानाच्या स्पर्धेत साध्य करून दाखवणार्या स्वप्निलच्या स्वागतासाठी कोल्हापूरकरांनी नाद खुळा तयारी केल्याचे पाहायला मिळाले. डोक्यावर फेटा आणि हातात पदक घेऊन स्वप्निलची अगदी ऐटीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील क्षण डोळ्याचे पारणे फेडणारे असेच होते. यावेळी हेलिकॉप्टरमधून त्याच्यावर पुष्पवृष्टीचा वर्षावही करण्यात आला.
स्वप्निल कुसाळे याची मिरवणूक ताराराणी चौकापासून ते दसरा चौकापर्यंत ढोल ताशा, हलगी आणि झांजपथकाच्या गजरात काढण्यात आली. कांबळवाडी या छोट्याशा गावातून जगातील मानाच्या स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी करणार्या स्वप्निलच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांमध्येही कमालीचा उत्साह दिसून आला. मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्याच्या कडेने शाळेतील मुलेही त्याच्या स्वागतासाठी उभी होती. कारण स्वप्निल आज या सर्वांसाठी नवे प्रेरणास्थान बनला आहे.
स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात पदकी निशाणा साधला होता. कांस्य पदकासह त्याने नेमबाजीत नवा विक्रमही प्रस्थापित केला. रायफल थ्री पोझीशन प्रकारात भारताला पदक मिळवून देणारा तो पहिला नेमबाज आहे. एवढेच नाही तर खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणारा महाराष्ट्राचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे