भक्तांचे श्रद्धास्थान कोंडजाई देवी

। तळा । वार्ताहर ।
तळेगाव येथील कोंडजाई देवी भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून सार्‍या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कोंडजाई देवस्थान तळेगाव कासब्याच्या पूर्वेस नदीची जी कोंड तयार झाली, तिच्या काठावर आहे. तळा या शहरापासून तळेगाव 10 कि.मी. अंतरावर आहे. तेथून वाहणार्‍या मंदा नदीमुळे तळेगाव, चांदोरे, चरई, उसर, साई ही गावे समृद्ध झाली होती. मंदा नदी जेथे कोंडीत अडकली आहे, तेथे त्यांच्या कुलदेवतेचे मंदिर बांधल्यावर त्या देवीला ‘कोंडजाई’ म्हणू लागले. याठिकाणी बारामाही पाणी आहे. कोंडजाई देवळाचा पहिला जीर्णोद्धार 1966 साली झाल्याची नोंद आहे.

कोंडजाई येथे कौलारू छप्पर असलेले मंदिर बांधावे असे सर्व वेदक बंधूंनी ठरविल्यावर गणेश पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली. या संस्थेने साडे दहा फूट बाय साडे तेरा फूट आकाराचे मंदिर बांधण्याचे कंत्राट चारशे रुपयांना रघुनाथ कल्याणकर यांना दिले. त्यांनी सुमारे वीस दिवसात कौलारू मंदिर बांधून तयार केले. मंदिर तयार झाल्यावर चौथर्‍यावर कोंडजाई, चंडिका व गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पौष शुद्ध दशमी 2 जानेवारी 1966 रोजी दत्तात्रय पोतदार या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे दर्शन घ्यावे या हेतूने पौष शुद्ध दशमीला दरवर्षी कोंडजाई देवीचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात पडला. दरवर्षी हजारो भाविक देवीच्या उत्सवाला येत असतात. उत्सव कमिटीमार्फत निवास आणि भोजनाची व्यवस्था होत असल्याने मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आदी शहरातील देवीभक्तांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

Exit mobile version