पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात

सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड जिल्ह्यातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त पनवेल येथे आयोजित कोकण विभागीय सत्यशोधक परिषद रविवारी (दि. 12) उत्साहात पार पडली. या परिषदेत प्रमुख पाहुणे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच दि.बा. पाटील यांच्या कार्याची प्रेरणा घेत, चांगल्या गोष्टी आत्मसात करून वाईट प्रवृत्ती दूर करत सत्यशोधक विचारसरणी समाजात रुजवण्याची गरज अधोरेखित केली.

परिषदेच्या उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या सुरेखा दळवी यांनी आदिवासी व कष्टकरी समाजाच्या न्यायासाठीच्या आपल्या लढ्याचा उल्लेख करत, हा लढा म्हणजे सत्यशोधनाचा प्रवासच असल्याचे सांगितले. व्यापक परिवर्तनाच्या चळवळीत आपण जबाबदार वारसदार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटन सत्राचे अध्यक्ष उत्तम जोगदंड, महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य सरचिटणीस आरती नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हस्ते नावीन्यपूर्ण पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. महापुरुषांच्या पुस्तकांची प्रतिकात्मक रचना करून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी उत्तम जोगदंड यांनी फेक न्यूजच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करत, सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून ‌‘फॅक्ट चेक’चे महत्त्व आजही तितकेच अधोरेखित होत असल्याचे सांगितले. उपस्थितांनी सत्यशोधक विचारांवरील कला प्रदर्शनालाही मोठी दाद दिली.

परिषदेतील दुसऱ्या सत्रात ‌‘ज्योतिबा ते दि.बा. पाटील वारसा सत्यशोधनाचा’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर व शिवराज्य प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष ॲड. रोशन पाटील यांनी मराठी शाळा वाचवण्याचा लढा हा महात्मा ज्योतिबा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे मत ठामपणे मांडले.

ज्येष्ठ पत्रकार दिपक म्हात्रे यांनी दि.बा. पाटील यांच्या वैचारिक भूमिकेवर प्रकाश टाकला, तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते अतुल म्हात्रे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर सत्यशोधक विचार हा उपाय ठरू शकतो, असे प्रतिपादन केले. परिषदेची सांगता शिक्षण, धर्म, विवाह व लैंगिकतेविषयक कायद्यांबाबत ठराव मांडून करण्यात आली. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

Exit mobile version