2023 चा भारतातील विश्वचषक वेगळा आहे. या विश्वचषकात खेळपट्ट्या, हवामान, प्रतिस्पर्धी याच्या क्षमतेवर निकाल अवलंबून आहेत. यावेळी आणखी एक गोष्ट अधोरेखित होत आहे. ती गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठी वापरण्यात येणारा चेंडू. आयसीसीने विश्वचषकाच्या कुकाबूरा या ऑस्ट्रेलियात निर्माण होणाऱ्या चेंडूची निवड केली आहे. हा चेंडू प्रामुख्याने वेगवान, मध्यमगती गोलंदाजांना अधिक सहाय्यक ठरतो, हा आजवरचा अनुभव आहे. भारतातील खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचे साम्राज्य किमान या विश्वचषकात तरी उभे राहू नये यासाठीच आयसीसीचा प्रयत्न आहे.
विश्वचषकातील आत्तापर्यंत झालेल्या 14 सामन्यांवर नजर टाकल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती गोष्ट म्हणजे, साधारणपणे 20 ते 25 षटकांपर्यंत कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणासमोर कोणत्याही संघांला चांगली सुरूवात करता येते. अपवाद एखाद-दुसरा सामन्याचा. पण सामन्याच्या अर्ध्यावर चांगली सुरूवात बहुतांशी सामन्यांमध्ये पहायला मिळाली आहे. पण गडी बाद होणे सुरू होते 25 षटकानंतरच. त्यानंतर जो संघ व्यवस्थित किंवा क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाल्यास ‘टाईट खेळतो’, त्यांनाच गोलंदाजीच्या प्रभावाबाहेर पडता येते आणि धावा फटकाविता येतात. हे सर्वसाधारणपणे गोलंदाजीचे समतोल आणि उत्तम आक्रमण असणाऱ्या सर्व संघांच्या बाबतीत पहायला मिळाले आहे. म्हणजे पाहा, चेंडूची लकाकी असताना प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांनी सुरूवातीला एक किंवा दोन गडी बाद केले आहेत. मात्र त्यानंतर दर्जेदार गोलंदाजीच्या आक्रमणालाही नंतरच्या गडी बाद होण्यासाठी बराच काळ प्रतिक्षा करावी लागली आहे.
आतापर्यंत झालेल्या सामन्यावरच नजर टाकू या. अहमदाबादच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडला मोठी धावसंख्याच उभारता आली नाही. त्याच सामन्यात 1 बाद 10 वरून न्यूझीलंडने दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची अभेद्य भागीदारी केली. हैदराबादच्या सामन्यात नवोदित हॉलंडनेही 24 व्या षटकात 2 बाद 120 अशी दमदार मजल मारली होती. पण त्यानंतर कूकाबूरा बॉलने आपली करामत दाखविली. पाकिस्तानच्या मध्यमगती गोलंदाजांनी रिव्हर्स स्वींग चांगले केले आणि फिरकी गोलंदाजांनी टप्पा अचूक पकडली. 24 षटकानंतर अवघ्या 16 षटकात हॉलंडचा संघ सर्वबाद झाला. त्याआधी पाकिस्तानचा संघ देखील दुबळ्या हॉलंडविरूद्ध प्रारंभी 3 विकेट लवकर गमविल्यानंतरही 286 धावा करू शकला. धर्मशाला येथील नंतरच्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात मोठी धावसंख्या नोंदविलीच गेली नाही. नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 10 नंतर 31 व्या षटकात 2 बाद 214 अशी दमदार सुरूवात केली. आणि यंदाच्या स्पर्धेतील 428 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. श्रीलंका संघाने देखील दमदार सुरूवात केली. मात्र 44 षटकात त्यांचा डाव 326 धावात आटोपला. चेन्नईच्या खेळपट्टीवर 27 षटकात 2 बाद 110 अशी दमदार मजल मारणारा ऑस्ट्रेलियाचा संघ 27 ते 49 षटकांदरम्यान कोसळला. 3 बाद 2 अशा धक्कादायक सुरूवातीनंतर कोहली-के.एल. राहूल यांच्या 165 धावांच्या भागीदारीने भारताला विजयाचा पैलतीर गाठून दिला.
हॉलंडविरूद्ध सामन्यात 26 षटकात न्यूझीलंडची 1 बाद 144 अशी दमदार सुरूवात होती. हॉलंडनेही 25 षटकात 2 बाद 117 अशी मजल मारली होती. पाकविरूद्ध श्रीलंकेने 28 षटकात 2 बाद 218 धावा फटकाविल्या होत्या. पडझड नंतर झाली. त्याच सामन्यात सुरूवातीला 2 विकेट लवकर गमाविल्यानंतर पाकिस्तानने 33 षटकात 2 बाद 213 अशी मजल मारली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात दक्षिण आफ्रिकेनेही 28 षटकात 1 बाद 158 अशी मजल मारली होती. इंग्लंडविरूद्ध सामन्यात अफगाणिस्ताननेही 19 व्या षटकात 1 बाद 122 अशी दमदार सुरूवात केली होती. भारताविरूद्ध सामन्यात 191 धावात कोसळलेल्या पाकिस्तान संघांची 22 व्या षटकात 2 बाद 156 अशी सुस्थितीत होती. न्यूझीलंडविरूद्ध 20 षटकात 1 बाद 92 नंतर बांगलादेशाचे पतन झाले. सांगण्याचा मुद्दा हा की हा कुकाबूरा चेंडू फार वाईट नाही. प्रारंभीची चेंडूची लकाकी खेचून काढली. वेगवान गोलंदाजांचा पहिला स्पेल व्यवस्थित खेळून काढल्यास कोणत्याही संघाला मग 25 ते 30 षटकांपर्यंत भिती नाही. मात्र त्यानंतर हाच चेंडू करामती करायला लागतो. जमलेली जोडी फोडतो. एका टोकाकडून द्वार खुलं झालं की, मग गडी बाद होण्याची रांग लागायला सुरूवात होते. सर्वसाधारणपणे ज्या अशा भरभक्कम आरंभानंतर संघ साडेतीनशे धावसंख्येची अपेक्षा करतात. त्या लक्षापर्यंत सर्वच संघ अजून काही पोहोचले नाहीत, हीच खरी आश्चर्याची गोष्ट आहे. यंदाच्या स्पर्धेत सामने दुपारी 2 वाजता सुरू होत आहेत. मैदानावर, दवबिंदूचा परिणाम होऊन मैदान ओलसर होऊ नये,यासाठी एक विशिष्ठ प्रकारचे रसायन मारले जाते. मात्र काही अवधीनंतर त्या रसायनाचा फारसा फायदा होत नाही. मात्र विश्वचषकाचे सामने 9 ते 9-30 या अवधीत संपत असल्यामुळे दवबिंदूचा फारसा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होताना दिसत नाही. मात्र त्या अवधीत विकेट पडण्याचे प्रमाण खाली येऊ शकते. ‘कुकाबूरा’ च्या अदाकारीच्या अभ्यास करून केला. या स्पर्धेत फायदा घेतो, ते लवकरच लक्षात येईल.