23 ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी
। मुंबई । वृत्तसंस्था ।
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नईतून ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला आज अंधेरी सेशन्स कोर्टात दाखल केलं होतं. कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर त्याला सोमवार दि.23 ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवलं गेलं, असा दावा ड्रगमाफिया ललित पाटीलने मीडियासमोर केला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा ललित पाटीलकडून करण्यात आल्याचं एका वकिलांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे. ललित पाटील कुठे आणि कसा पळून गेला? याबाबतची कोणतीही चर्चा कोर्टात झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, यात कोणाकोणाचा हात आहे, हे सर्व सांगेन असा इशाराही ललित पाटीलने दिला आहे. ललित पाटील करत असलेल्या दाव्यात खरंच तथ्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. ललित पाटील ज्या प्रकारे ससूनमधून पळाला तेव्हाच खरंतर संशयाची सुई निर्माण झाली होती. ललित पाटीलला नाशिक पोलीस शोधत असतानाच ललित पाटील नाशिकमध्येच होता ही गोष्टही समोर येत आहे. तसेच ललित म्हणतो त्याप्रमाणे ललितला पळवलं गेलं असेल तर यात कोण कोण सहभागी होतं याचा शोध घेतला गेला पाहिजे. ललितला पळवण्यात नेमका काय उद्देश होता, कोणाकोणाची नावं तपासात लपवली जात आहेत का हे प्रश्न ललितच्या दाव्यामुळे उपस्थित होत आहेत.
ॲड. अमित मिश्रा यांनी सांगितलं की, "आरोपीनं कोर्टासमोर सांगितले की, पुणे पोलिसांकडून त्याच्या जीवाला धोका आहे. आरोपीच्यावतीने वकिलांनी न्यायालयीन कोठडीची विनंती केली. पण सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, हे मोठं ड्रग्ज रॅकेट असून यामध्ये 12 आरोपी आहेत. यामध्ये बारावा आरोपी म्हणजे ललित पाटील याला अटक झाली आहे. त्यानं पोलीस चौकशीत सांगितलं की, ड्रग्ज बनवण्यासाठीचा आपण कच्चा माल भूषण पाटील याला देत होतो, हा रुग्णालयातून हे रॅकेट चालवत होता. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत न्यायाधिशांनी ललित पाटीलला सोमवारपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.