कोर्लईः अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या हालचाली सुरु

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील समुद्रकिनारी सर्व्हे नंबर 21मधील जागेतील बांधकाम तोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हे बांधकाम सीआरझेडचे उल्लंघन करीत बेकायदेशीररीत्या करण्यात आले आहे, असा ठपका अलिबागच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. बांधकाम करणाऱ्या मालकाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून ते तोडण्याचे आदेशही देण्यात आले.

अलिबाग व मुरुड तालुक्यात सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महसूल प्रशासनाकडून कारवाई करूनदेखील काही धनदांडगे समुद्रकिनारी मोठमोठे इमले बांधत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मुंबई येथील देवदत्त मसुरेकर यांनी कोर्लई येथे उच्चतम भरती रेषेपासून काही अंतरावर अनधिकृत रिसॉर्ट बांधकाम केल्याची तक्रार मुरुडच्या तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. यामध्ये पडीक रुम, कॉटेज, वाहन पार्कींगसाठी पत्र्याचे शेड, सुरक्षा रक्षक केबीन, जेवणाची खोली, मागील व समोरील शेड आदींचा समावेश आहे.

या तक्रारीनंतर तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्या पध्दतीने अहवालही तहसीलदार यांना पाठविण्यात आला. देवदत्त यांनी सीआरझेडच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या अनधिकृत बांधकामाबाबत नुकतीच रेवदंडा पोलीस ठाण्यात पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 15 नुसार व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम 1966 नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी त्या मालकाविरोधात कारवाई करण्याबरोबरच बांधकाम तोडण्याचे लेखी आदेश दिले आहेत.त्यासाठी तहसीलदारसह बांधकाम विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामसेवक व रेवदंडा पोलीस निरीक्षक राहूल अतिग्रे यांचे पथकदेखील नेमण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच हे बांधकाम तोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version