| उरण | वार्ताहर |
उरण तालुका आजच्या घडीला विकासात्मक दृष्टीने चांगलीच झेप घेत आहे. आज या भागात बऱ्याचशा गावांना सिडको प्रकल्पा अंतर्गत जमिनी गेल्यामुळे सिडकोच्या साडेबारा टक्क्याअंतर्गत जमीन वाटप करण्यात आल्या आहेत. काहींना या जमिनी मिळणे बाकी आहे. लवकरच होणाऱ्या विमानतळ प्रकल्पामुळे उरण परिसरातील जमिनींचा भाव वाढला आहे. त्यामुळे काही लोकांनी खासगी विकासकांना आपल्या जागा विकल्या आहेत, त्यातूनच हे विकासक टोलेजंग इमारती उभारत आहेत. आज अमाप पैसा उरण परिसरातील गावतील नागरिकांना आला आहे. मात्र एकीकडे लक्ष्मीची कृपा होत असताना आधुनिक शैलीची घरे बांधण्याकडे नागरिकांचा कल असल्याने उरण परिसरातील कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी पावसाचे आगमन होण्याच्या अगोदर उरण परिसरातील खेडेगावात घरावरती असलेली कौल व्यवस्थित करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असायची.
उरण परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे असल्यामुळे ती कौल सारखी करण्यासाठी प्रत्येकाची लगबग असायची. परंतु, बदलत्या काळात कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र उरण परिसरात दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती घर बांधताना कौल न वापरता सिमेंट कॉक्रीटीकरण करून स्लॅब व सिमेंटच्या पत्र्यांचा उपयोग करीत आहे. यामुळे मातीची कौल इतिहास जमा होत चालली आहे.
आज उरणच्या ग्रामीण भागात सिमेंटच्या जंगलांनी घरे व्यापली जात आहेत. कौलारू घर उन्हाळ्यातही गरम होत नाही. यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असून मातीची कौल ही उन्हाच्या झळा शोषूण नैसर्गिक गारवा पुरवितात आज उरण परिसरात जुनी कौलारू घरे दिसतात, अनेक कौलारू घरे तोडून नवीन पद्धतीची घरे बांधण्याचे प्रकारही सुरु आहेत. तसेच नवीन घरे कौलारू न बांधता नव्या पध्दतीने घरे बांधत असल्याने हळू हळु कौलारू घरेही नामषेश होत चालली आहे.
उरण परिसर हा कोकणाचा भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे पूर्वीपासून उरण परिसरात कौलांरु घरे बांधली जात, ही घरे येथील वातावरण पाहता एकदम योग्य अशी घरे आहेत मात्र विकासात्मक बदलांमुळे लोकांकडे पैसा आला आहे त्यामुळे लोक कौलारू घरे न बांधता आधुनिक पद्धतीची स्लॅबची घरे बांधत आहेत त्यामुळे कौलारू घरे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.