रायगडातील कृउबा समिती निवडणुकीचे बिगूल: पनवेल मविआचे अर्ज

| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गेली अनेक वर्षे पनवेल एपीएमसीवर शेकापचा वरचष्मा राहिला आहे. एपीएमसीच्या एकूण 17 जागांसाठी येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. सोमवारी( दि.3 एप्रिल) महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यात आले असून यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले.

याप्रसंगी माजी आ.बाळाराम पाटिल, बबन पाटिल, सुदाम पाटील. काशिनाथ पाटील, नारायण घरत, रामदास पाटील, नंदराज मुंगाजी, रघुनाथ पाटील, कांती गंगर, विश्‍वास पेटकर, शंकर म्हात्रे, दत्ता कोपरकर, प्रवीण कांबळे, अखिल अधिकारी, अ‍ॅडय अरुण कुंभार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आघाडीच्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा तालुका सहकारी निवडणुक अधिकारी, पनवेल तालुका भारती काटुळे यांच्याकडे दाखल केले. 5 एप्रिल रोजी आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही 20 एप्रिल असून 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या दरम्यान मतदान घेतले जाणार आहे, त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.

सुरुवातीपासून सातत्याने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी कामगार पक्षाचे आणि मित्र पक्षांचे वर्चस्व राहिलेले आहे. आगामी निवडणुकीला आम्ही मंडळी महाविकास आघाडी म्हणून सामोरे जात आहोत. एकूणच उत्साह पाहता अतिशय मोठ्या फरकाने ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल यामध्ये कोणतीही शंका नाही, असा विश्‍वास यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीतही भाजपने मोठे आव्हान दिले होते. विजयासाठी भाजपच्या आमदारांनी प्रचंड ताकद पणाला लावली होती. परंतु महाविकास आघाडीने सर्व जागा जिंकून आपले वर्चस्व सिध्द केले. याचे कारण म्हणजे जनता ज्यांच्या बरोबर आहे त्यांचाच विजय होतो व यापुढेही होईल. आणि जनता कायम महाविकास आघाडीबरोबर आहे. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपने कितिही ताकद लावली तरीही जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच आहे.


जुन्या, नव्यांना संधी
पनवेल, उरण तालुक्यांबरोबरच घाटमाथ्यावरील शेतकरी आपले कृषी उत्पादन घेऊन पनवेलच्या बाजारात येतात. कृषी उत्पन्न बाजार समितीत गेली अनेक वर्षे शेकापची सत्ता आहे. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी शेकापसह महाविकास आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने अनुभवी उमेदवारांसह यावेळी तरुण उमेदवारांनाही मोठी संधी दिली आहे.

Exit mobile version