ट्विटरचे संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी आपल्या पदावरून पायउतार होत असून ते जाणार असल्याचे गेले वर्षभर चर्चा सुरू होती. मात्र जाताना त्यांनी आपला वारस जाहीर केला आहे. तो म्हणजे ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग अग्रवाल. सदतीस वर्षीय अग्रवाल आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जॅक डोर्सी यांच्याकडून पदभार स्वीकारत आहेत. त्यामुळे अग्रवाल आता भारतीय असलेले आणि अमेरिकन तंत्रज्ञान कंपनीचे टॉप बॉस असलेल्यांच्या यादीत सामील झाले आहेत. या यादीत आता आयबीएमचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्ण, मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ सत्या नडेला, गुगल तथा अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, अडोबीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे अग्रवाल हे या यादीतील सर्वांत तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटीचे विद्यार्थी असलेले अग्रवाल यांची मार्च 2018 मध्ये ट्वीटरच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांनी अग्रवाल यांच्या ट्विटर सीईओ म्हणून नियुक्तीबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये अमेरिकेला भारतीय प्रतिभेचा खूप फायदा होतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे म्हटले आहे. दादाभाई नौरोजी यांनी दीडशे वर्षांपूर्वी इंग्रज सरकार भारतातील बौद्धिकसंपदा भारतातून आपल्या देशात आयात करीत आहे आणि त्यामुळे भारतीयांना त्या बौद्धिकसंपदेवर अधिकार सांगता येणार नाही आणि त्यांना ते उपलब्ध होत नाही असा सिद्धांत तेव्हाच्या परिस्थितीवर मांडला होता. इंग्रजांनी देशातील बुद्धीमान व्यक्तींना आपल्या देशात येण्यास आणि आपल्या सरकारसाठी काम करण्यास प्रलोभित आणि प्रभावित केले होते. तेच एका अर्थाने आताही म्हणता येईल. मात्र आता जग बदलले आहे आणि ते नव्या तंत्रज्ञानामुळे सपाट आणि सर्वांसाठी समान संधींचे बनले आहे. अनेक वर्षांपूर्वी आणि आजही भारतातील अनेक कंपन्यांनी परदेशी लोकांना मानाची पदे दिली आहेत, तसे आता भारतातील लोकांना जगाच्या पातळीवर ती संधी मिळत आहे. एका अर्थी त्याचा नकारार्थी विचार करता येतो की अशा संधी आपण भारतात निर्माण नाही करू शकलो, पण दुसर्या बाजूने आपण आपल्या देशाचे नागरिक जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन कामगिरी बजावतात आणि जगभर प्रभाव पाडणार्या तंत्रज्ञान क्षेत्राचे, माध्यमांचे नेतृत्वही करतात, असेही प्रेरणादायक दृष्टीने पाहता येते. मुंबईतून आयआयटी केल्यावर अग्रवाल यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर ते सॉफ्टवेअर अभियंता म्हणून ट्विटर कंपनीत रुजू झाले. स्टॅनफर्ड येथे शिकत असताना, त्यांनी मायक्रोसॉफ्ट, याहू! आणि एटीअँडटी लॅबसाठी रिसर्च इंटर्न म्हणून काम केले होते. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या नात्याने, अग्रवाल यांच्यावर कंपनीच्या तांत्रिक रणनीती आखणे, मशीन लर्निंग आणि कृत्रीम बिु्द्धमत्तेचा वापर तसेच देखरेख आदी जबाबदार्या होत्या. दहा वर्षांपूर्वी ट्वीटरमध्ये आल्यापासून, त्यांनी कंपनीची जाहिराती प्रणाली विस्तारण्यात आघाडीची भूमिका निभावली. तसेच, वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या प्रयत्नांना नव्याने गती दिली. कंपनीची नियुक्ती विशिष्ट वाढीच्या ध्येयपूर्तीसाठी असते. तशी त्यांचीही आहे. अग्रवाल हे अशा वेळी कंपनीच्या ड्रायव्हिंग सीटवर आहेत, जेव्हा ट्विटर आक्रमकपणे वाढू इच्छित आहे. येत्या दोन वर्षांच्या कालावधीत वार्षिक उत्पन्न किमान दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. 2023च्या अखेरीस कंपनीला सुमारे 31.5 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे दोन हजार तीनशे कोटी रुपये कमाई करण्यासाठी लागणारे दैनंदिन सक्रिय वापरकर्ते मिळवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. त्याचबरोबर ट्वीटरचे पायउतार होत असलेले डॉर्सी यांच्या कार्यकाळात झालेल्या मोठ्या वादांचा आणि भारतात सरकारशी झालेल्या संघर्षांचा सामना त्यांनाही करावा लागेल. डॉर्सी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम यांचे ट्वीटर हँडल कायमचे बंद केले होते. तसेच भारतातील नवीन तंत्रज्ञान नियमांच्या पूर्ततेला धरून केंद्र सरकार आणि ट्वीटर यांच्यात संघर्ष रंगला होता. त्यानंतर तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांचे ट्वीटर हँडलही काही काळ बंद केले गेले होते. तसेच ट्वीटरवर काही आक्षेपार्ह वक्तव्यांना झुकते माप दिल्याचे तसेच पक्षपाताचेही आक्षेप घेतले गेले होते. ट्वीटर काही वर्षांतच मुख्य वृत्तप्रसारणाचे माध्यम बनले आहे. म्हणून वादग्रस्तही आहे. त्यांची कारकीर्द नक्कीच पाहण्याजोगी असेल, यात शंका नाही.
भारतीय बौद्धिकसंपदा

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025