धार्मिक उन्मादाचा अतिरेक

देशातील धार्मिक आणि जातीय उन्माद कोणत्या पातळीवर पोचला आहे, याचे दर्शन घडविणार्‍या दोन घटना घडल्या आहेत. एक राजकीय पातळीवर जो विद्यमान सरकारच्या पक्षातर्फे भडकवला जात आहे, त्यासंबंधीही आहे आणि दुसरी सामाजिक सुधारणावादी राज्य मानल्या जाणार्‍या आपल्या महाराष्ट्रातील आहे. या दोन्ही घटना शरमेने मान खाली घालायला लावणार्‍या तर आहेतच, शिवाय इथपर्यंत आपण कसे पोचलो, याबाबत अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आपल्यावर आणणार्‍या आहेत. पहिल्या घटनेत बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी मध्यप्रदेशातल्या एका कॉन्व्हेेंंट शाळेवर दगडफेक केली. शाळेच्या पदाधिकार्‍यांवर या कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा आरोप केला. मध्यप्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातल्या गंज बसोडा इथल्या सेंट जोसेफ या शाळेच्या बाहेर 300 लोक जमा झाले आणि आंदोलन करु लागले. यावेळी शाळेत 12 वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. काही काळातच हा जमाव आक्रमक झाला आणि शाळेच्या मालमत्तेची तोडफोड केली. शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर अँथनी टायन्युमकल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, या जमावाकडे लोखंडी सळया आणि दगड होते, ते शाळेवर फेकताना हा जमाव ‘जय श्रीराम’अशा घोषणा देत होता. शाळेचे ब्रदर अँथनी यांच्या मते त्यांनी पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी उलट हा जमाव केवळ घोषणाबाजी करेल आणि शांततेत निघून जाईल, असे सांगितले. सगळे गुंड तोडफोड करुन निघून गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे नेटके सेट लावून नाटक केल्यासारखी पोलिसांनी आपली ड्युटी बजावली. काही दिवसांपूर्वी बंगलोरमध्ये कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनचा शो रद्द केल्यानंतरही असाच गुंडांचा जमाव त्याच्या घराभोवती जमा झाला होता. तेथे पोलिसांनी अधिक प्रामाणिकपणा दाखवला. ते गुंडांच्या सोबतच आले होते. त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला नाही की पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी असतात. ही शाळा 11 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. त्यात दीड हजार विद्यार्थी शिकतात. आधी धर्मांतराची खोटी बातमी पसरवायची आणि मग तोडफोड करायची, ही त्यांनी मोडस ऑपरेंडी गेली अनेक दशके देश पाहात आहे. हा प्रकार तर जनतेचे मूलभूत अधिकार संकुचित करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा सरकार पुरस्कृत कार्यक्रम आहे, हे स्पष्ट आहे. मात्र दुसर्‍या घटनेत आपल्या सुधारणावादी राज्यात अद्याप ऑनर किलिंगच्या घटना घडतात आणि कोणत्याही नात्यांवर विश्‍वास बसू नये अशी एक भीषण घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात गोयगाव या छोट्या गावात घडली आहे. एका किशोरवयीन तरुणाने आपल्या 19 वर्षीय गर्भवती बहिणीचा त्याच्या आईच्या मदतीने शिरच्छेद केला आणि तिचे धडापासून वेगळे केलेले शीर शेजार्‍यांना दाखवले. त्यानंतर आई-मुलाने कापलेल्या मुंडक्यासोबत सेल्फी घेतली. आई-मुलाने या आपल्याच रक्ताच्या मुली आणि बहिणीची हत्या केली याचे कारण तिने त्यांच्या संमतीशिवाय लग्न केले होते. असा काय जात, समाजाचा विळखा मनावर बसावा की आपले आणि आपल्या रक्ताचे नाते संपुष्टात यावे. आपल्या मर्जीने लग्न करणे हा गुन्हा झाला आणि त्याची शिक्षा अशी भोगावी लागणार. आणि आपण हे सगळे पाहणार, दोन दिवस चर्चा करणार आणि पुन्हा अशी घटना होईपर्यंत सोयीस्करपणे झोपी जाणार. या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित नसल्या तरी त्या स्वेच्छेने आपल्या मर्जीने जीवन जगण्याच्या अधिकारावर गदा आणण्याच्या प्रकाराबद्दलच्या आहेत. गोष्टी या थराला गेल्या कारण आपण पहिल्या वेळी त्याला विरोध केला नाही. आपल्याला पहिल्यांदा खाण्यापिण्यावर निर्बंध आणले, तेव्हा ते आपल्याशी संबंध नसल्याने आपण गप्प बसलो. ज्या शाळेवर दगडफेक झाली, परीक्षा देताना मुलांना मानसिक धक्का बसला, त्यात बहुसंख्य हिंदूच मुले शिकतात. बजरंग दल हिंदूंच्या रक्षणार्थ आहे असे सांगतो. मात्र त्यांना प्रत्येकाला आपल्या कह्यात ठेवायचे आहे. त्यांना बहिणीचा खून करू शकणारा 18 वर्षांचा तरुण हवा आहे. कारण त्यांचा मुक्त आविष्काराला विरोध आहे, मतप्रदर्शनाला, अभिव्यक्तीला विरोध आहे. त्याचा कडाडून विरोध करायलाच हवा, मुळात आपण सर्वच निर्बंध आणि धार्मिक व जातीय दबावाला विरोध करायला हवा. आपण प्रत्येकजण मुक्त आहोत आणि तसे जगण्याचा आपल्याला अधिकार आहे, यावर श्रद्धा हवी.

Exit mobile version