हिमलाट जगावर आली

अधिकृतरित्या नोव्हेंबर महिन्यापासून हिवाळ्यास सुरुवात होत असली तरी डिसेंबर महिना हा हिवाळ्याचे तापमान जोखण्याचा खरा काळ असतो. तसेही ऋतुंचे गणित अलिकडच्या काळात बदललेले असल्याने पावसाळ्याप्रमाणेच थंडीचेही वेळापत्रक बदललेले आहे. त्यामुळे पूर्वी नोव्हेंबरमध्येच हिवाळ्याची चादर वातावरणात पांघरली जायचीच. मात्र आता त्याची शाश्‍वती नाही राहिलेली. यंदाही नोव्हेंबर अखेरपर्यंत हिवाळ्याने आपले आगमन होऊ दिले नाही. हिवाळा आला आणि निदान पहाटे तरी थंडी जाणवते असे नोव्हेंबरच्या मध्यास वाटत असताना महिना संपायला येईस्तोवर पुन्हा ऑक्टोबरसारखेच वातावरण निर्माण झाले होते. वादळी वातावरणामुळे हवामानात बदल होऊन ऐन हिवाळ्याच्या मोसमात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे थंडी पडण्यास उशीर झाला. डिसेंबर सुरू झाल्यानंतर हळुहळू थंडीचा स्तर वाढत गेला आणि आता डिसेंबरच्या मध्यास थंडीने आपला कहर दाखवायला सुरुवात केली आहे. थंडीचा तडाखा आता कमालीचा वाढल्याने उत्तर भारतात सगळीकडे हुडहुडी भरवणारे दृश्य निर्माण झाले आहेच, शिवाय त्याच्या सुखद गारव्याचे रूप महाराष्ट्रातही अनुभवयाला मिळत आहे. अर्थात ही थंडी गुलाबी असेतोवर हवीहवीशी वाटते. त्याचे तापमान ठराविक पातळीच्या खाली यायला लागल्यावर ती जीवघेणीही होऊ शकते. गेल्या दहा वर्षांत भारतात दरवर्षी येत असलेल्या अशा हिमलाटांनी अनेकांचे प्राण घेतले आहेत. सीमाभागांत तसेच अन्य उत्तरेकडील राज्यांत या थंडीच्या लाटेचा फटका मोठा असतो. ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या आणि त्याभोवताली लोक हात अंग शेकत बसलेले दिसतात. तरीही आपल्या देशातील गरीब जनतेची परिस्थिती पाहता त्यांच्यासाठी हा ऋतू अधिक घातक ठरतो. कोणताही आसरा नसलेले, रस्त्याच्या कडेला आपली पाठ टेकवणारे बेघर,  देशाचे नागरिक या थंडीत गारठून मरण पावतात. अनेक स्वयंसेवी संस्था अशा व्यक्तींना हिवाळ्यापासून स्वत:चे रक्षण करता यावे या हेतूने स्वेटर, चादरी यांचे वाटप करतात. मात्र अनेक लोक भटके असतात आणि त्या सगळ्यांना याचा लाभ मिळतोच असे नाही. तसेच, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीचा तडाखा अधिक असतो. दरवर्षी नवा निच्चांक गाठणार्‍या या थंडीच्या हल्ल्यापासून प्राण वाचवण्यासाठी हे संरक्षण पुरत नाही, असेही घडते. उदा. सुमारे दहा वर्षांपूर्वी तीव्र झालेल्या थंडीच्या लाटेत उत्तरेत जवळपास शंभर जण मरण पावले होते. हे बहुतेक उत्तर प्रदेशातील वयस्क आणि बेघर लोक होते. 2012 मध्ये अचानक तापमान खूप खाली आले होते. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि त्रिपुरा या उत्तरेकडील तसेच पूर्वेकडील राज्यांनाही या थंडीचा फटका बसला होता. नवी दिल्लीत ख्रिसमसच्या दिवशी सात अंश असलेले तापमान नवीन वर्षदिनी एक अंशावर असे वेगात घसरले होते. यंदाही अशीच उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. त्यामुळेच थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. शनिवार 18 डिसेंबरपासून चंदीगड आणि उत्तर राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली होती. पंजाबसह अनेक राज्यांमध्ये दोन-तीन दिवसांत किमान दोन ते तीन अंशांनी तापमान घसरण्याची शक्यता असल्याचे सांगितले गेले होते. जम्मू तथा काश्मीर तसेच लडाख, गिलगिट मुझफ्फराबाद भागांत आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दरवर्षीप्रमाणे थंडी पडणार असली तरी तेथे पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली होती. हा अंदाज खरा ठरला आहे आणि हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये तापमान शून्याच्या खाली गेल्यानंतर राजस्थानातील अनेक भागांत तापमान शून्याच्याही खाली गेले आहे. याचा एक परिणाम म्हणजे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडी वाढणार असल्याने महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होऊ शकतो. येथे थंडी दररोज वाढायला लागली आहे आणि सातत्याने मागील काही दिवसांत तापमानात घट होत असल्याचे जाणवत आहे. नाशिक, पुण्यासारख्या ठिकाणी त्याची तीव्रता जाणवतेच, शिवाय रायगड आणि अलिबाग येथेही ती चांगलीच हुडहुडी भरवणारी ठरते. ती रायगडात जीवघेणी ठरत नसली तरी सध्याच्या कोरोनाच्या काळात, या विषाणूला थंडी अनुकूल ठरत असल्याचे सिद्ध झाल्याने तशी भीतीही लोकांना वाटत आहे. थंडीचा मोसम अजून काही आठवडे आहे. महाराष्ट्रातही थंडी अजून मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे काळजी घेत राहिले पाहिजे.

Exit mobile version