निवडणूक प्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीदिनाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने भाषण करताना इतिहासाचे जे तारे तोडले ते पाहता लोकांनी आश्‍चर्याने तोंडात बोटे घालण्याऐवजी शरमेने मान खाली घालणे पसंत केले. कारण देशाचा पंतप्रधान असलेला माणूस निदान त्याला देशाचा इतिहास नीट माहिती पाहिजे अशी माफक अपेक्षा असते. मात्र आपल्या देशाला दुर्दैवाने पंतप्रधान मिळण्याऐवजी निवडणूक प्रधान मिळाले आहेत. खोटारडेपणा, हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करून निवडणूक जिंकणे आणि देशाने अनेक दशकांत मिळवलेली संपत्ती आपल्या उद्योजक मित्रांच्या घशात घालणे यावर त्यांची मदार आहे. म्हणूनच त्यांनी गोवा अशा वेळी पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आला जेव्हा मुघलांनी देशाच्या इतर प्रमुख भागांवर राज्य प्रस्थापित केले होते. त्यानंतर भारताने अनेक राजकीय वादळे आणि सत्तेत बदल पाहिले, परंतु राजकारणात बदल होऊनही गोवा भारतीयत्वाला किंवा भारत गोव्याला विसरला नाही, असे भाषण केले. पोर्तुगीजांनी गोव्यावर ताबा मिळवला तेव्हा भारताचा महत्त्वाचा भूभाग मुघलांच्या ताब्यात कसा होता हा इतिहास थोडाफार जाणणार्‍यांनाही पडलेला प्रश्‍न आहे. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया उमटल्या आणि इतिहास जसा आहे तसा सांगण्याचा प्रयत्न झाला. वास्को द गामा भारतात आल्यानंतर गोव्यात खर्‍या अर्थाने पोर्तुगीज राजवटीला सुरुवात झाली ती अल्फोंसो डी अल्बुकर्कने 1510 मध्ये प्रस्थापित राज्यकर्त्यांवर विजय मिळाला तेव्हा. गोव्यात बिजापूर सल्तनतचे राज्य होते आणि त्याचा शासक इस्माईल आदिलशाह याच्याकडून गोवा जिंकला आणि गोव्यात प्रभावीपणे पुढच्या साडेचारशे वर्षांची पोर्तुगीज राजवट प्रस्थापित केली. मुघलांचे साम्राज्य प्रारंभ झाले ते पानिपतच्या पहिल्या लढाईपासून जी 1526 साली झाली. त्यावेळी दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधी याचा पराभव बाबरने केला आणि देशात मुघल साम्राज्याचा पाया रचला. हे साम्राज्य एकोणिसाव्या शतकात इंग्लंडचे राणीचे राज्य येईपर्यंत टिकले. म्हणजे पोर्तुगीज गोव्यात बाबरच्याही तब्बल सोळा वर्षे आधी आले. अर्थात वास्तवात मोदी यांना स्वारस्य नाही. कारण त्यांचे मुख्य काम हिंदुत्वाचा प्रभाव बळकट करून गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला निवडून आणणे आहे. त्यासाठी नेहमीचा मुघल, मुसलमान यांना शत्रूरूपात सादर करणे त्यांना सोयीचे असते. त्यासाठी त्यांनी पोर्तुगीज राजवटीला आपल्या जवळ केले. मुळात अल्बुकर्क याला आदिलशहाच्या विरोधात गोव्यातील हिंदू राज्यांनीच बोलावून घेतले होते, हा इतिहास ते गैरसोयीचा असल्याने लपवून ठेवणार. असाच एक खोडसाळ प्रकार मोदी यांनी अलिकडे काशी येथे केलेल्या भव्य इव्हेंटमध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते विश्‍वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘श्री काशी विश्‍वनाथ धाम का गौरवशाली इतिहास’ या पुस्तिकेतील ‘काशी आणि शीख धर्म’ या परिच्छेदावर पंजाबमधील शीख विद्वानांनी आक्षेप घेतला आहे. त्यात पंजाबमध्ये शिख धर्माची स्थापना मुघलांपासून सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी झाली आणि त्या धर्माचा अभ्यास करण्यासाठी शिख धर्मसंस्थापकांनी आपल्या खास अनुयायांना काशी येथे पाठविले होते, असे नमूद करण्यात आले आहे. त्यालाही आक्षेप घेण्यात आला असून हा परिच्छेद काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. हा दावा निंदनीय, आक्षेपार्ह आणि पूर्णपणे विकृत असल्याचे इतिहासकार सांगत आहेत. शीख धर्माचा इतिहास विकृत करण्यात आला आहे आणि पुस्तिकेत चुकीचे चित्रण करण्यात आले आहे आणि त्यावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. शीख विचारवंत आणि माजी आयएएस अधिकारी गुरतेज सिंग यांनी जाहीरपणे हा संपूर्ण मजकूर पूर्णपणे चुकीचा असून इतिहासाची हेतुत: करण्यात आलेली मोडतोड आहे, असे म्हटले आहे. उत्तरप्रदेश सरकारची अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही. ती येण्याचीही शक्यता नाही. कारण त्याच्या जोरावर निवडणुका जिंकण्यासाठी लोकांच्या मनात खोट्या गोष्टी भरवून हिंदू मुस्लीम द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे. अशाच प्रकारे इतिहासाची मोडतोड करत, असत्याचा आधार घेत तो हेतू सफल होईल, असे त्यांना वाटते. शीख धर्म हा हिंदू सनातन धर्माच्या रक्षणासाठी नव्हे तर दलित आणि शोषित वर्गाच्या संरक्षणासाठी अस्तित्वात आला, ही बाब इतिहास वाचणार्‍या कोणाच्याही लक्षात येईल. त्यामुळे आपण नागरिकांनी खर्‍या इतिहासाबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. आपण नीट वाचन केले तर राज्यकर्त्यांचा खोटारडेपणा अशा प्रकारे उघडा पाडता येतो.

Exit mobile version