रायगड पोलिसांना ‘सलाम’

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय अर्थात आपल्याबरोबरच समाजाचेही रक्षण करा, हे ब्रीदवाक्य छातीवर घेऊन समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करणार्‍या रायगड पोलीस दलाने गुन्हे प्रगटीकरणात कोकण विभागात सर्वोत्तम कामगिरी करीत पोलीस दलाचे नांव उंचावले आहे. शिवाय जनतेचा विश्‍वासही कमावला आहे. याबद्दल सर्व पोलीस दलाचे अभिनंदन. पोलीस दलातील श्‍वान पथकाचेही कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनाही यानिमित्ताने शाबासकीची थाप देणे योग्य ठरेल. रायगड हा मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांना समिप असल्याने या जिल्ह्यात औद्योगिकीकरण, पर्यटन हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. शिवाय मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे हे दोन महामार्गही रायगड पोलिसांच्या हद्दीतून जात असल्याने रायगड पोलिसांना नेहमीच डोळ्यात तेल घालून जागते रहोची आरोळी ठोकत करडी नजर ठेवावी लागते. सुदैवाने रायगड पोलीस हे आव्हान समर्थपणे पेलताना दिसतात. एखादा, दुसरा अपवाद वगळता रायगडातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात जिल्हा पोलीस दल नेहमीच यशस्वी ठरल्याचे दिसून येते. अर्थात पोलिसांना रायगडच्या सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सर्वसामान्य नागरिक यांचे मनापासून सहकार्य असते. शक्यतो कायद्यात राहूनच रायगडात घडामोडी घडत असतात. त्यामुळे रायगड पोलिसांना तशी दमछाक करावी लागत नाही. राज्यात आणि देशात घडणार्‍या प्रत्येक चांगल्या, वाईट घडामोडींचे पडसाद नेहमीच रायगडच्या कानाकोपर्‍यात उमटत असतात. पण ते पडसाद उमटत असतात कुठल्याही राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी अथवा सर्वसामान्यांनी कायदा हातात घेतलाय असे कधीच झालेले नाही. उलट परस्परांच्या सामंजस्यातून परिस्थितीवर तोडगा काढण्यातच उभय पक्षांनी धन्यता मानली आहे. त्यामुळे रायगड संवेदनशील असला तरी हिंसाचारी अथवा हिंसाचाराला पुरक अशी कृती करणारा जिल्हा नाही ही रायगडची प्रतिमा आजतागायत अबाधित राहिलेली आहे. रायगडात गेल्या वर्षभरात नैसर्गिक संकटांची जणू मालिकाच कोसळली होती. त्यावेळी सर्वसामान्यांच्या मदतीला पोलीस दलही महसूल यंत्रणेसह धावले हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. सामाजिक बांधिलकी जपत कोरोना साथीत तसेच जलप्रलयाच्या वेळी पोलीस यंत्रणेनेच पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत विविध माध्यमातून सुपूर्द केलेली आहे.शिवाय लॉकडाऊन काळातही ज्यांच्या घरी खायचे अन्न नव्हते अशा कुटुंबांना पोलिसांनी सामाजिक जाणिवेचे भान ठेवत अन्नधान्याचे वाटप केलेले आहे. हे करताना कुठल्याही प्रकारचा गाजावाजाही एकाही पोलीस ठाण्याने अथवा अधिकारी, कर्मचार्‍यांने केला नाही. त्यामुळे रायगडच्या जनतेला नेहमीच आपल्या पोलीस दलाबद्दल सार्थ अभिमान वाटत आलेला आहे. दरवर्षी गृहविभागातर्फे पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. वर्षभरात रायगड जिल्ह्यात 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खून सोशल मिडीया, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक, मारामारी दरोडा सारख्या घटना घटल्या होत्या.  2021 सालामध्ये 2 हजार 254 गुन्हे दाखल असून त्यापैकी 2 हजार 031 गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. 82 टक्के प्रकरणात गुन्हेगारांवर तपास लावून त्यांना जेरबंद करण्यात रायगड पोलिसांना यश आले. गुन्हे प्रगटीकरणात कोकण परिक्षेत्रात रायगड पोलीस दल सर्वोतम ठरले आहे. हे निश्‍चितच अभिमानास्पदच म्हटले पाहिजे. कारण विविध कारणांमुळे रायगडात निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस दल आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे.वास्तविक गुन्हेगारी ही समाजाला लागलेली एक कीडच आहे. ती कधीच नष्ट होणारी नाही. पण त्यावर वेळीच उपाय केले. झालेल्या गुन्ह्यांचा उकल होत राहिला तर निश्‍चितच गुन्हेगारांवर वचक बसल्याशिवाय राहणार नाही. रायगड पोलीस दल ब्रिटीशकाळापासून कार्यरत आहे. आतापर्यंत अनेक मान्यवर अधिकार्‍यांनी रायगडचे पोलीस प्रमुख पद भूषविलेले आहे. त्यातील अनेक अधिकारी उच्चपदापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे रायगड पोलीस दलाला एक गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. ती टिकविण्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक अशोक दुधे आणि त्यांच्या टीमवर निश्‍चित आहे. अर्थात ती प्रतिमा टिकविण्याबरोबरच आणखी उंचावण्यात रायगडची पोलीस टीम निश्‍चितच यशस्वी ठरली आहे. अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी त्यांचे आत्मबळ वाढो आणि रायगडची कायदा, सुव्यवस्था अबाधित राहो, शिवप्रभूंचा रायगड शांत राहिला पाहिजे,एवढीच सदिच्छा.

Exit mobile version