लालपरी पुन्हा धावू दे!

राज्याची जीवनवाहिनी म्हणून गेली सत्तर वर्षे कानाकोपर्‍यात धावणारी लालपरी गेल्या दोन महिन्यांपासून आगारात ठप्पपणे उभी आहे. ती कधी धावेल आणि राज्याच्या विकासाची गती कधी गतिमान होतील याचीच चिंता राज्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना लागलेली आहे. स्वाभाविकच आहे, कारण लालपरी, अर्थात एसटीचे राज्याच्या विकासात मोठे योगदानच आहे. त्यामुळे ती जोपर्यंत धावत होती, तोपर्यंत राज्याचे विकासचक्रही वेगाने धावत होते. पण, दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संघटनांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन जो काही संप सुरु केला, त्याला आता पुरेे दोन महिने झालेले आहेत. या दोन महिन्यांत थोड्या प्रमाणात एसटी सुरु झाली खरी; पण तिला म्हणावी तशी गती आलेलीच नाही. ती सुरु व्हावीत यासाठी सरकारने विविध माध्यमातून प्रयत्न सुरु केलेले आहे.कर्मचार्‍यांना अपेक्षित अशी पगारवाढ देण्याबरोबच संपकाळात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न करण्याची ग्वाही वारंवार दिलेली आहे. तरीही संपकरी एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरुन मागे हटायला तयार नाहीत. त्यांच्या सर्व मागण्या रास्त आहेत, हे निश्‍चितच खरे आहे. पण, संप करताना किती करायचा, ताणायचे तर कुठपर्यंत ताणायचे, हेच कर्मचारी संघटनांच्या तथाकथित पुढार्‍यांना उमगलेले नाही. त्यामुळे संपकरी एसटी कर्मचार्‍यांबाबत आतापर्यंत जी सहानुभूती सर्वसामान्यांना वाटत आलेली होती ती आता कमी होऊन त्याची जागा तिरस्काराने घेतली जाऊ लागली आहे. संप करणे हे प्रत्येक कर्मचार्‍यांचा हक्क आहे. पण, तो करताना नेहमीच आपले पोट, जीवन ज्या घटकांवर अवलंबून आहे, त्या घटकाशी सामाजिक बांधिलकी दाखविणेही तितकेच योग्य ठरणार आहे. आज एसटी सुरु नसल्याने एसटीवर अवलंबून असलेल्या सर्वच सर्वसामान्य घटकांची मोठी परवड झालेली आहे. त्यामुळे हा संप आता मिटणे, ही काळाची गरज बनलेली आहे. ते ओळखूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्यासह संपकरी संघटनांचे पदाधिकारी, कृती समिती पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन संप मिटविण्याचे आवाहन केलेले आहे. मागण्या योग्य असून, त्या सोडविण्याची हमी सरकार देत असल्याची ग्वाहीही पवारांनी दिलेली आहे. आपली बांधिलकी ही प्रवाशांशी आहे हे विसरु नका, असा सल्ला वडीलकीच्या नात्याने पवारांनी एसटी कर्मचारी संघटनांना दिलेला आहे. त्याचा आदर राखत संपकर्‍यांनी आता संप मागे घेत पुन्हा लालपरी सक्रिय करावी, कारण विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ठ आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसारच समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या समितीचा अहवाल यायला अजून बराच कालावधी आहे, तोपर्यंत एसटी संप सुरु राहिला तर त्याचा फटका महामंडळाबरोबरच एसटी कर्मचार्‍यांनाही बसणार आहे. कारण, आतासुद्धा नरमाईची भूमिका घेत संपकर्‍यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचे परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी जाहीर केलेले आहे. शिवाय, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असेल, अशी ग्वाही दिलेली आहे. सरकार जर एवढे आत्मविश्‍वासाने सांगत असेल, तर एसटी कर्मचार्‍यांनीही दोन पावले मागे जात संप मागे घेणे हितावह ठरणार आहे. दोन महिने संप सुरु असल्याने संपकरी एसटी कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहात होताना दिसत आहे. शिवाय, जे नेतृत्व करीत आहेत, ते अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांच्याबाबतही एसटी कर्मचारी संघटनांमध्ये कमालीची नाराजी आहे. सदावर्ते यांच्या आततायीपणामुळे संप भडकला, अशी कबुलीच आता संपकरी कृती समितीने दिलेली आहे. त्यामुळेच आता सदावर्ते यांच्याऐवजी नवीन वकील नियुक्त करण्यात आलेला आहे. यामुळे एसटी कर्मचार्‍यांचे डोळे उघडले, असेच म्हणावे लागेल. कारण, ज्यांचा एसटीशी काहीही संबंध नाहीत, अशी मंडळी जर संपाचे नेतृत्व करु लागली, तर तो संप मिटण्याऐवजी चिघळतच राहणार आहे. हे महाराष्ट्राला न शोभणारे असेच आहे. कारण, आतापर्यंत एसटी कर्मचार्‍यांनी अनेकदा संप केला; पण सरकारकडून आवश्यक त्या मागण्या मान्य झाल्या की एसटी पुन्हा रुळावर येत असे. मग आताच का हा संप इतका काळ चालला, याचा तपास होणे गरजेचे आहे. कारण, आधीच कोरोनाने महाराष्ट्राचे विकासचक्र रुतलेले आहे. ते थोडे गतिमान होत असतानाच विकासाची मुख्य घटक असलेली लालपरी अशी रुतून बसणे, हे राज्याच्या प्रगतीला बाधा आणणारे आहे, हे नक्की.

Exit mobile version