आघाडीची सरशी

राज्यात कोणती आघाडी सत्तेवर आहे किंवा विरोधकांची एकी कशी आहे या मुद्द्याचा स्थानिक पंचायत पातळीवरील निवडणुकीत काही वेळा महत्व असले तरी स्थानिक पातळीवरील मुद्दे आणि आघाड्या अधिक महत्त्वाच्या असतात. या पंचायत पातळीवरील निवडणुकांवर पक्षाची सावली नसावी अशी अपेक्षा असली तरी राजकीय अवकाशाचा विस्तार शेवटी पक्षाशीच येऊन ठेपतो. कारण, कोण लोकांची कामे करतो आणि कोण नाही याची जाणीव जनतेसाठी महत्त्वाची असते आणि पक्षपातळीवर तसे काम करणे आणि ओळख निर्माण करणे सोपे जाते. या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. तसेच राज्यभरातील विविध पंचायतीच्याही निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. रायगडमध्ये जे चित्र दिसते त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष या आघाडीचे वर्चस्व सिद्ध झालेले दिसते आहे. पाली, खालापूर, माणगाव, म्हसळा, तळा या पाच नगरपंचायती मध्ये राष्ट्रवादी आणि शेकापक्षाला जनमताचा कौल मिळाला आहे, असे दिसते. तर पोलादपूर नगरपंचायतीमध्ये काँग्रेसला शिवसेनेने धूळ चारत विजय मिळवलेला दिसतो. या ठिकाणी अन्य पक्षांचे अस्तित्व दिसत नाही. जिल्ह्यात नव्याने स्थापित झालेल्या पाली नगरपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे सर्वाधिक लक्ष लागले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सहा आणि शेकापने चार जागा जिंकून सत्ता मिळविली असून शिवसेनेला चार आणि भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकजण अपक्ष उमेदवारही येथे निवडून आलेला आहे. त्यामुळे या नगरपंचायतीत वर्चस्व मिळविल्याने राष्ट्रवादी शेकाप आघाडीचाच नगराध्यक्ष विराजमान होईल हे स्पष्ट झाले आहे. खालापूर नगरपंचायतीचा निकाल काहीसा अनपेक्षित असा असला आणि तेथे निवडणूक पूर्व आघाडी नसली तरी शेकापला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन अशा जागा मिळून एकूण 17 जागांपैकी नऊ जागा होत असल्याने शिवसेनेला आठ जागा मिळाल्या असल्या तरी येथे शेकाप आणि राष्ट्रवादी हेच पुन्हा एकत्र येत सत्ता स्थापन करतील असा अंदाज आहे. माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सात तसेच शेकापसह अन्य जणांना दोन जागा मिळाल्या असल्या आणि शिवसेनेला सात ठिकाणी विजय मिळाला असला तरी इथेही राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र येऊन सत्ता सांभाळतील, यात शंका नाही. तळा मध्ये सेनेच्या ताब्यातील सत्ता हिसकावत राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा पटकावल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती येणार हे स्पष्ट आहे. मात्र या ठिकाणी भाजपने चंचुप्रवेश केलेला आहे, हेही नमूद करायला हवे. म्हसळा नगर पंचायतीत 13 जागा मिळवत राष्ट्रवादीने आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. येथे शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला दोन जागा मिळाल्या. पोलादपूर मध्ये मात्र शिवसेना 10 जागा मिळवून सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे. काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची बनविली होती. मात्र त्यांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. थोडक्यात, रायगडमध्ये शेकापने जनतेची जी कामे या काळात आणि त्या त्या भागांत केली ते पाहिलेल्यांना शेकापला तसेच शेकापने राष्ट्रवादीशी केलेल्या आघाडीला आलेले यश पाहून अजिबात आश्‍चर्य वाटणार नाही. रायगडप्रमाणे राज्यातील अन्य जिल्ह्यांतही काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे तर काही ठिकाणी सत्ताबदलही झाले. थोडक्यात, राज्यातील आघाडी सरकारच्या पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यात आघाड्या स्थानिक गरजेनुसार बनल्या. मात्र एक समान गोष्ट दिसून येते ती म्हणजे स्थानिक कामे आणि जनतेशी त्या त्या पक्षाच्या उमेदवारांची जुळलेली नाळ समान आहे. आर. आर. पाटील यांचा पुत्र रोहितने यामुळेच कवठे महांकाळ येथे राजकारणात यशस्वी पदार्पण केले आहे. हाच मुद्दा सर्वांनी लक्षात घेऊन कामे केली तर राज्याचा, जिल्ह्याचा, परिसराचा विकास होईलच, त्याचबरोबर जनतेचेही भले होईल. जनतेच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर उतरणार्‍या शेतकरी कामगार पक्षाने आपल्या कामातून रायगडमध्ये हे यश मिळवले आहे. आवश्यक तेथे आघाडी करण्याचे राजकीय शहाणपणही दाखवले आहे. तरी खरा विजय हा जनतेचाच झाला आहे आणि हेच महत्त्वाचे आहे.

Exit mobile version