एकविसाव्या शतकातील बावीस सालात महाराष्ट्र प्रांती एकाएकी हनुमानाच्या भक्तांमध्ये वाढ झाली आहे. हनुमान हा खरं तर चिरंजीव आहे. तरीही इथले भक्त त्याचा चैत्र पौर्णिमा हा जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करतात. शनिवारी ही जयंती जोरात साजरी झाली. पूर्वी सूर्योदयाच्या वेळी हनुमानजन्माचा उत्सव साजरा करून मंडळी आपापल्या कामाला रवाना होत. यंदा मात्र दिवसभर जागर करण्यात आला. पंतप्रधानांपासून तो महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी या जयंतीच्या लोकांना शुभेच्छा दिल्या. खरं तर शुभेच्छा ज्याचा वाढदिवस आहे त्याला द्यायला हव्यात. शिवाय, यंदा एकाएकी मनसे, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष आणि काँग्रेससारखे नवभक्त लाभल्यामुळे त्या वज्रहनुमान मारुतीला अशा शुभेच्छांची गरज देखील होती. असो. हनुमान हा खरं तर शक्तीचा देव. पण म्हणून, बुद्धीशी त्याचे वाकडे आहे असे नव्हे. उलट, सूर्याने आपल्या तेजाचा शंभरावा हिस्सा त्याला वर म्हणून दिला होता. त्याला सर्व शास्त्रांचे अध्ययन करण्याची बुध्दिमत्ता मिळेल असे म्हटले होते. पण प्राचीन काळापासून हनुमंताच्या बुद्धिपेक्षा शक्तिमानपणाच्याच गोष्टी प्रसृत करण्यात आल्या. समोरच्याला घाबरवायचं असेल तर याचं नाव घ्यायचं अशी पद्धत पडली. ‘तोड दे दुश्मन की नली’ असं म्हणून पूर्वापारपासून याला दमदाटी मंडळाचा नेता असल्यासारखं वागवलं गेलं. आतादेखील भोंग्यांचं निमित्त करून याला आपल्या ध्वजावर घ्यायचं आणि आवेशाने त्यालाच पुढे लोटायचं असं चाललं आहे. खरं तर एक लिंबू दहा रुपयांना मिळण्याच्या आणि पन्नास किलोमीटरसाठी एकशेवीस रुपयांचे पेट्रोेल लागत असण्याच्या काळात हे भक्त स्वतःच थोडे लोकनाथ झाले तर समोरच्यांची देखता कापती भये अशी स्थिती होईल. पण यांना भलतीकडेच हनुमानउडी मारायची आहे. यांचे प्राण ज्याच्यात गुंतलेले आहेत त्या मतांचा हा महाबळी दाता ठरेल आणि बळाने आपल्याला उठवून सत्तेत ठेवील अशा आशेनं हे त्याच्या नावाने गर्दी जमवत आहेत. काही जण तर आपल्या प्राणप्रिय मराठीला लाथ मारून ‘दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते’ असा अवधी भाषेतला गुणगौरव गाऊ लागले आहेत. बहुधा, सतराव्या शतकात ठीक आहे, पण त्या भीमरुपी महारुद्राला आता मराठी येत असेल की नाही अशी शंका या नवभक्तांना आली असावी. यातही गंमत अशी की, त्या अंजनीसुताचं जन्मस्थळ दक्षिणेतलं मानलं जातं. त्यामुळे त्याची आणि चाळीस स्तुतीवळसे रचणार्या तुलसीदासाची मातृभाषा एक असण्याचं ‘सुतराम’ कारण दिसत नाही. शिवाय, त्या पवनपुत्राची गती ‘मनासि टाकिले मागे’ अशी आहे. पण तेरा आमदार ते नाशिक पालिकेतसुद्धा तीन तेरा अशा ‘मनसे गती’वाल्या भक्तांना ती काय मदत करणार हा प्रश्नच आहे. पण, किंवा म्हणूनच, या नवभक्तांच्या चालिसाचा आवाज दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. लंका जाळून हनुमंताने रावणाला संभाव्य युध्दाचा इशारा दिला होता. या नवभक्तांचेही बुभुत्कार सुरू झाले आहेत. आता तसंच युध्द करायचं आहे आणि आपण ज्यांच्याविरुध्द बोलतोय ते जणू रावणच आहेत, असे भोंगे लावण्यात आले आहेत. खरं तर आपल्या अवतीभवती एक युध्द आधीपासूनच चालू आहे. ते सामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यात उत्पात माजवत आहे. त्यांची सीता नव्हे तर सुखानं जगण्याची संहिताच पळवून नेली गेली आहे. नवभक्तांना पराक्रम दाखवण्याची खरी संधी तिथे आहे. महाबलीचा खरा आशीर्वाद त्यांना तिथेच मिळेल. पण त्याऐवजी ते भलत्याच मार्गाला लागले आहेत. दूरच्या लंकेऐवजी आपण जिथे राहतो त्याच प्रदेशाला आग लावायला निघाले आहेत. महाबली हा श्रीरामाचा सेवक होता. सध्याचे नवभक्त रामाचे नाव घेणार्यांचे सेवक होऊ पाहत आहेत. जिथे जिथे म्हणून रामकथा सांगितली जाईल तिथे हनुमान उपस्थित राहतील असं मूळ रामायणात म्हटले होते. पण सध्या जी चालू आहे त्या कथेत हनुमंताला खरंच काही राम वाटेल का आणि आपल्या कथनी-करणीने तो महाबली प्रसन्न होईल की कोपेल याचा विचार या नवभक्तांनी करावा.
वाढता वाढता वाढे

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025