भारत सासणे हे दीर्घकथा लेखक म्हणून मराठीला ठाऊक आहेत. आजवर त्यांची वाटचाल एकटेपणाने झाली. ते कधीच कोणत्या गटा-तटातटात सामील झाले नाहीत. समाजात उद्भवणार्या वादांवर त्यांनी कधीही मते व्यक्त केली नाहीत. कथा, कादंबरी हेच आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे असे त्यांनी मानले. कदाचित आजवर ते सनदी अधिकारी होते त्याचाही हा परिणाम असेल. या पार्श्वभूमीवर उदगीरच्या साहित्य संमेलनात सासणे काय बोलणार याविषयी उत्सुकता होती. त्यांच्या आजवरच्या लेखकीय प्रकृतीनुसार ते साहित्यातील काही प्रश्न घेऊन एखादे प्रकट चिंतन करतील असे वाटत होते. त्या सर्व कल्पनांना सासणे यांनी जोरदार व सुखद धक्का दिला आहे. अध्यक्षीय भाषण म्हणून त्यांनी एक प्रकट चिंतनच केले आहे. कलावंत हा अस्वस्थ का असतो याविषयी आरंभी त्यांनी विवेचन केलं. पण नंतर मात्र त्याचे धागेदोरे थेटपणे आजच्या राजकारणाशी जोडले. किंबहुना, प्रचलित राजकारणातील धर्मांध आणि विद्वेषी प्रवृत्तींवर इतक्या नेमकेपणाने आणि नाव घेऊन त्यांनी हल्ला केला आहे की, मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात इतके धारदार भाषण क्वचितच झाले असेल. लेखकाने परिस्थितीचे विश्लेेषण केले पाहिजे आणि त्याने निर्भयपणे सत्य बोलले पाहिजे हे सासणे यांच्या भाषणाचे सूत्र आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि त्यांचे हिंदुत्वाचे राजकारण यावर सासणे यांनी प्रखर टीका केली. कोरोनाकाळात थाळ्या वाजवण्याचा इव्हेंट करणार्यांना त्यांनी जे जुने संदर्भ दिले ते विचार करायला लावणारे होते. दुर्गादेवीच्या बारा वर्षांच्या दुष्काळामुळे भुकेकंगाल लोकांचे तांडे थाळ्या वाजवत बाहेर पडले आणि अन्नासाठी दिसेल त्याला ठार मारू लागले हा तो संदर्भ आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सध्या अमृतकाल साजरा करणार्यांचीही त्यांनी खिल्ली उडवली. इतिहासामध्ये राहूला तुम्ही अमृतवाटपाच्या पंगतीत सामील होऊ दिले नाहीत म्हणून तो आणि केतू आता आपल्यावर मदांध होऊन सूड घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला. एक मूर्ख माणूस खुर्चीवर बसणं हे हजार योध्दे मरण्यापेक्षा अधिक नुकसानकारक असतं या रुमीच्या वचनाची आठवण त्यांनी करून दिली. काशी, मथुरा, अयोध्येचे राजकारण करणारे आणि मुस्लिम आणि ख्रिश्चनांविरोधात मोहिमा उघडणारे कथित संस्कृतिरक्षक यांचाही त्यांनी स्पष्टपणे समाचार घेतला. या परिस्थितीबाबत ज्ञानी लोकांनी बाळगलेलं मौन हे विनाशाकडे नेणारं ठरेल असे सांगून त्यांनी आपल्या स्वजातीयांना – म्हणजेच लेखक व विचारवंताना-निर्भयपणे बोलत राहण्याचे आवाहन केले. सध्याच्या काळाचे वर्णन भ्रमयुग असे करून त्यांनी आपण सर्वजण विध्वंसाच्या आणि काळरात्रीच्या दिशेने निघाल्याची भीती व्यक्त केली. मात्र, शेवटी लेखक म्हणून मला आशावादी राहणं क्रमप्राप्त आहे असे सांगायलाही ते विसरले नाहीत. सासणे यांचे भाषण अनेकांना राजकीय वाटण्याचा संभव आहे. पण मुळात काहीतरी सनसनाटी निर्माण करणे वा प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न करणे ही सासणे यांची प्रवृत्ती नाही हे लक्षात घ्यायला हवे. मात्र, आज सभोवताली, चोवीस तास प्रत्येक गोष्टीचे राजकारण चालू असल्यानेच त्यांची ही प्रतिक्रिया आली आहे. सासणे यांनीच म्हटल्याप्रमाणे सिनेमासुध्दा तुमचा आणि आमचा अशी विभागणी होऊ लागली आहे. अशा स्थितीत लेखकाने अस्वस्थ होऊन स्पष्टपणे आपली भूमिका मांडणे व समाजाच्या सगळ्या नाड्या आपल्या हातात ठेवू पाहणार्यांना चार गोष्टी सुनावणे ही अत्यंत रास्त अशीच कृती आहे. सासणे यांनी योग्य वेळी, योग्य रीतीने व योग्य व्यासपीठावर ही कृती केली याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांनी केलेली टीका ही भाजप व मोदी यांच्यावर आहे असे म्हणून आता भक्त मंडळी बहुधा त्यांच्यावर तुटून पडतील. पण तसे न करता एका चिंतनशील लेखकाची ही मते या भक्तांंनी शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सासणे साहित्यातल्या व राजकारणातल्या कोणत्याही विचारसरणीशी जोडून घेत नाहीत हे लक्षात घेऊन एक स्वतंत्र लेखक म्हणून त्यांच्या भूमिकेचा विचार करायला हवा.
सासणे, तुम्ही तर चकित केलेत…

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026