महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे वगनाट्याची स्पर्धा असावी असे चालले आहे. मध्यंतरी कोणी एक सदावर्ते एकाएकी नव्वद हजार एसटी कामगारांच्या वतीने बोलू लागले. नंतर, कोणी एक नवनीत राणा आणि त्यांचे पती एकाएकी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचे आंदोलन करण्याची धमकी देऊ लागले. राज ठाकरे यांचा नेहमीचा हातखंडा नकलांचा प्रयोग होऊन गेला. शिवाय, कोणावरही सैरावैरा आरोप करू शकणारे किरीट सोमय्या आणि सरकारवरचा प्रत्येक हल्ला आपल्या अंगावर घेणारे संजय राऊत यांचे सवालजबाब रोज चालू आहेत. हा सर्व काहीतरी करमणुकीचाच कार्यक्रम आहे अशा रीतीने वृत्तवाहिन्या दिवसरात्र त्यांचे लाईव्ह प्रसारण करीत आहेत. टीव्हीवरच्या कॉमेडी किंवा नृत्याच्या शोचे परीक्षक किंवा महागुरु जसे प्रत्येकालाच, ‘जबरदस्त’ किंवा ‘मित्रा तोडलंस’, अशी दाद देतात, तसे हे वाहिनीवाले वाट्टेल त्या गोष्टींना ‘महा-प्रसिध्दी’ देत सुटले आहेत. पेट्रोेल, गॅस, भाज्या, रोजचा किराणा यांचे दर प्रचंड वाढले आहेत. भीषण उन्हाळा व काही ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकरी तसेच सामान्य लोकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. बेकारीची स्थिती गंभीर आहे. पण हे आणि इतर सर्व प्रश्न बाजूला पडून महाराष्ट्रातल्या सर्व राजकारण्यांना मशिदीवरचे भोंगे हा सर्वात मोठा प्रश्न वाटत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना असल्याने आणि मुख्यमंत्री पूर्णतः सक्रिय नसल्याने असल्या प्रश्नांच्या हाताळणीत कसलाही समन्वय नाही. राणा यांनी मातोश्रीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यावर सरकारने खरे तर हा प्रश्न पोलिसांना हाताळू द्यायला हवा होता. पण गेले अडीच वर्षे संयम बाळगून असलेल्या शिवसेना नेत्यांना यावेळी राहवले नाही. शिवसैनिकांनी राडा आणि मुद्द्यांचा विचका केला. या स्थितीमुळे भारतीय जनता पक्षाचे फावते आहे. सदावर्ते असो की राज ठाकरे वा राणा, त्यांच्यामागे भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे हे लपून राहिलेले नाही. सरकार खाली खेचण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे. शिवाय स्वतःच्या कार्यकर्त्यांची शक्ती वा वेळ आंदोलनात वाया न घालवता पाहुण्यांच्या काठीने साप मारण्याचे त्यांचे राजकारण चालू आहे. रोजच्या रोज पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि वाट्टेल ती टीका करायची अशी भूमिका देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी स्वतःकडे ठेवली आहे. त्यांना ठळक प्रसिद्धी मिळेल हे पाहायला त्यांच्यावर भाळलेली माध्यमे आहेतच. यामुळे महाराष्ट्रात काहीतरी भयंकर अनर्थ चालू आहे असे बाहेरील कोणाला वाटू शकते. भाजपने हे जे काही चालवले आहे ते अत्यंत घातक राजकारण आहे. यांचे नेते नरेंद्र मोदी दिल्लीत मारे विकास की राजनीती वगैरे भाषणे देत असतात. पण महाराष्ट्रच नव्हे तर अन्य राज्यात, जिथे ते सत्तेत नाहीत, तिथे भाजपचा हा विध्वंसक चेहराच समोर येत असतो. राणा यांच्या प्रकरणातही हेच दिसले आहे. त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे हा सरकारचा अतिरेकीपणा आहे. पण राणा यांचे वर्तनही तसेच अतिरेकी होते. खुद्द उच्च न्यायालयानेही काल राणा यांना फटकारले आहे. पण ते लक्षात न घेता या राज्यात हनुमान चालिसा म्हणण्यालाच विरोध आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हा निव्वळ विकृत प्रचार आहे. एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेल्यांना तो शोभत नाही. दरम्यान राज्य सरकारने या प्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलावली हे योग्य झाले. या मुद्द्यांवरुन जातीय तेढ वाढवू नये ही शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी घेतलेली भूमिका आता सर्वांनीच स्वीकारायला हवी. केंद्रानेच भोंग्यांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करावीत ही मागणी करून राज्याने चातुर्य दाखवले आहे. पण भाजप आणि इतर राजकीय पक्षांनी व नेत्यांनी आता थोडा शहाणपणा दाखवण्याची गरज आहे. सध्या चालू असलेल्या राजकीय तमाशाची जनतेला आता चीड येऊ लागली आहे. या तमाशातील मस्करीची कुस्करी होण्यापूर्वी आता सर्वांनी थांबणे इष्ट.






