बडे बेआबरू होकर..

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान व अन्य पाच जण अमली पदार्थ प्रकरणातून सुटले असल्याने दुसर्‍याचे तोंड काळे करायला निघालेल्या प्रचारी मंडळींची भलतीच बेअब्रू झाली आहे. आर्यन खान व अन्य मित्र हे एका क्रूझवर प्रवासासाठी निघाले असता त्यांना गेल्या ऑक्टोबरात अटक करण्यात आली होती. आर्यनसह या सर्वांचा अमली पदार्थांची वाहतूक करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचा सनसनाटी दावा तपास अधिकार्‍यांनी केला होता. मोबाईलवरचे त्यांचे चॅट्स तसेच फोटोज इत्यादी गोष्टी पुरावे म्हणून सादर करण्यात आले होते. आता त्याच अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी पुराव्यांअभावी त्यांची नावे आरोपपत्रातून वगळली आहेत. तपास अधिकार्‍यांनी जाणूनबुजून आर्यनला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला असा स्पष्ट ठपका ताज्या तपासाअखेर ठेवण्यात आला आहे. ज्यांच्यावर ठपका ठेवला गेला आहे ते अधिकारी म्हणजे समीर वानखेडे. त्यांची इतर आरोपांसंदर्भात सध्या चौकशी चालू आहे. आर्यनला अटक करण्यात आली तेव्हा हेच वानखेडे, त्यांच्या पथकातील अधिकारी आणि देशातील तमाम वृत्तवाहिन्या यांनी अमली पदार्थांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे असे चित्र उभे केले होते. तेव्हा वानखेडे यांना हिरो करण्यात आले होते आणि आर्यन व इतरांना खलनायक. या प्रकरणाच्या आधी सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरणही असेच गाजवण्यात आले होते. त्या व या आर्यन खानच्या प्रकरणात मिळून हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हे अमली पदार्थांच्या धंद्यात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. त्यातही हिंदू व मुस्लिम असा भेद होताच. शाहरूख हा मुस्लिम असल्याने व राहुल व प्रियांका गांधीशी त्याची जवळीक असल्याने त्याला लक्ष्य केले जात असल्याचे दिसत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही जणू भारतीय जनता पक्षानेच केलेली कारवाई आहे असे असल्यागत त्या पक्षाचे नेते हिरीरीने तिचे समर्थन करत होते. सर्व वृत्तवाहिन्यांनी देखील पत्रकारितेचे सर्व संकेत धाब्यावर बसवून आर्यनला जामीन नाकारला, त्याच्या पोलीस कोठडीत वाढ अशासारख्या बातम्या अत्यंत जल्लोषाने साजर्‍या केल्या होत्या. आता आर्यनच्या सुटकेनंतर आपण चुकलो असे म्हणून या वाहिन्या व भाजपसारख्या पक्षांचे नेते माफी मागतील काय? शिवाय, असे तोंड फोडून घेतल्यावर तरी आता हे सर्व लोक ताळ्यावर येऊन संयमाने वागतील-बोलतील काय? भाजपसारखे पक्ष आणि त्यांच्या ओंजळीने पाणी पिणारा मिडिया यांनी देशातील वातावरण गेल्या काही वर्षांपासून अत्यंत कलुषित करून टाकले आहे. आर्यन खान अटकेच्या काळात दिवसरात्र हाच मुद्दा लावून धरून देशातील इतर प्रश्‍न गायब करून टाकण्यात आले होते. दर काही दिवसांनी असेच नवनवीन मुद्दे पुढे आणून लोकांचे खरे प्रश्‍न दाबून टाकण्याची ही जी पध्दत भाजप व त्याच्या मित्र वाहिन्यांनी सुरू केली आहे ती सर्वांना खड्ड्यात घालणारी आहे. आता यांच्याच तपास अधिकार्‍यांनी थप्पड लगावल्यानंतर तरी महागाई, बेकारी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर गंभीर चर्चा सुरू करण्याची बुध्दी यांना व्हावी अशी अपेक्षा. व्हॉटसॅपवरचे संभाषण हा निर्णायक पुरावा होऊ शकत नाही असे आता नव्या तपास अधिकार्‍यांनी नोंदले आहे. पण यापूर्वी काही सूज्ञ लोकांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा वानखेडे, त्यांना उचलून धरणारी माध्यमे यांनी त्यांना मूर्खात काढले. या प्रकरणातील एक पंच किरण गोसावी यांच्या बर्‍याच संशयास्पद गोष्टी उघड झाल्या होत्या. पुढे यातूनच हे खंडणीचे प्रकरण आहे असे मानून मुंबई पोलिसांच्या पथकाने याचा तपास सुरू केला. तरीही न्यायालयांनी सुरुवातीला तपास अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार आर्यनला कोठडी दिली होती. कोणा राजकीय व्यक्तींच्या इशार्‍यावरून हा सर्व बनाव रचण्यात आला होता काय याचा तपास आता व्हायला हवा. आर्यन खान हा बड्या बापाचा मुलगा होता. त्याच्या वडिलांकडे उत्तम वकिलांसाठी देण्याजोगे पैसे होते. देशातील इतर हजारो गरीब लोकांकडे असे पैसे नसतात. त्यांना आर्यनप्रमाणे क्लिन चीट मिळण्याचा आनंद उपभोगता येत नाही हेही या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे.

Exit mobile version