सेकंदाला दोन लाख 

एकाच वेळी एका भागात प्रचंड पूर आणि दुसरीकडे दुष्काळ असे प्रकार आपल्या देशात नित्याचेच आहेत. आपली अर्थव्यवस्थाही कायम अशाच टोकाच्या घटनांनी गजबजलेली असते. सोमवारी जगभरातील महागाईच्या भीतीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1457 अंशांनी खाली कोसळला आणि रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी खालावून 78 च्या पलिकडे गेला. मात्र त्याच वेळी आयपीएलच्या पुढच्या पाच वर्षांसाठी टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रसारणाचे हक्क विकून बीसीसीआयला छप्पर फाडके म्हणजे 46 हजार 200 कोटी रुपयांची कमाई झाली. ही फक्त देशांतर्गत हक्क विक्री झाली असून मंगळवारी परदेशातील हक्कांची विक्री करून आणखी काही तीन ते चार हजार कोटी रुपये बीसीसीआयला मिळतील असा अंदाज आहे. एक सहज तुलना म्हणून करायची झाल्यास भारत फोर्ज या इंजिनिअरिंग कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे. बीसीसीआयला आयपीएलच्या निव्वळ हक्कांमधून आठ ते दहा हजार कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत. म्हणजे वर्षानुवर्षे मेहनत करून उत्तम इंजिनिअरिंग उत्पादने तयार करणार्‍या कंपनीपेक्षाही दहा वर्षांपूर्वी आलेल्या आयपीएलच्या प्रसारण हक्कांचा धंदा अधिक आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार टीव्हीच्या प्रसारणाचे हक्क डिस्ने स्टारला मिळाले आहेत. गेल्या वेळी टीव्ही अधिक डिजिटल प्रसारणाचे हक्क सोळा हजार कोटींना डिस्नेने विकत घेतले होते. आता केवळ टीव्हीच्या हक्कांसाठी 23 हजार कोटी रुपये मोजले जाणार आहेत. तर डिजिटल माध्यमांमध्ये म्हणजे इंटरनेट तसेच सोशल मिडियावरून या सामन्यांचे प्रसारण करण्यासाठी व्हायकॉम 18 ही कंपनी वीस हजार पाचशे कोटी रुपये मोजणार आहे. इतक्या प्रचंड रकमा देऊन प्रसारणाचे हक्क ज्यांनी विकत घेतले आहेत ते अधिक चढ्या दराने हे पैसे वसूल करणार हे उघड आहे. त्यामुळे टीव्हीवर आयपीएलचे सामन्यांच्या प्रसारणांच्या काळात प्रदर्शित होणार्‍या जाहिरातींचे दर वाढणार आहेत. गेल्या वेळी हे दर साधारण दहा सेकंदाच्या जाहिरातील सात लाख रुपये होते. उपांत्य किंवा अंतिम फेरीतील सामन्यांसाठी हे दर दहा सेकंदाला पंधरा लाख रुपयांपर्यंत जात असत. आता हे दर प्रति दहा सेकंदांना वीस लाख रुपयांवर जाणार आहेत. म्हणजे एका सेकंदाला दोन लाख रुपये. इतक्या प्रचंड रकमांनी जाहिरात करून ज्या वस्तू विकल्या जातील त्याही अर्थातच महाग असतील. मात्र त्यासाठी भारतात ग्राहक वर्ग भरपूर मिळेल अशी खात्री संबंधित कंपन्यांना असणार. त्यामुळेच तर इतके पैसे मोजायला त्या तयार होतील. या अर्थचक्राचा सारांश असा की, पुढच्या पाच वर्षांत भारतातून भरपूर पैसे मिळवता येतील अशी बीसीसीआय आणि या अन्य कंपन्यांची खात्री आहे. अर्थात, या कंपन्यांचे अंदाज नेहमीच बरोबर असतात असे नव्हे. डिस्ने स्टारला गेल्या वेळी टीव्ही व डिजिटल प्रसारणामधून फार फायदा झाला नाही, किंबहुना काही वेळेला नुकसान झाले अशा बातम्या आल्या होत्या. डिजिटल प्रसारणांच्या जाहिरातींमधून पुरेसा महसूल मिळण्याची व्यवस्थाही अजून विकसित झालेली नाही. पण तरीही ही जोखीम घ्यायला त्या तयार आहेत. कारण, या दोन्ही कंपन्या बहुराष्ट्रीय समूहांशी जोडलेल्या असून त्यांच्याकडे शेकडो कोटींचे तोटे पचवण्याची क्षमता आहे. अर्थातच, कोणतीही देशी कंपनी या प्रकारच्या व्यवहारात टिकू शकणे कठीण आहे. यांच्याकडे जाहिराती करणार्‍या कंपन्यांमध्येही देशी कंपन्या अभावाने दिसतील. एकूण, हा सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून नियंत्रित केला जाणारा खेळ आहे. एकीकडे देशात सामान्य माणसासाठी महागाई टोकाला जाऊन पोचली आहे. शेअर बाजारात याचेच भय आहे. काही दिवसांपूर्वी गाजावाजा केलेला एलआयसीचा शेअर सुमारे तीनशे रुपयांनी खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेने पुढचे नऊ महिने महागाई अशीच राहील असा इशारा दिला असून दर आणखी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. इतके असूनही बीसीसीआय आणि आयपीएलचा धंदा मात्र तेजीत आहे. कोरोना काळातही सामने भरवण्याचा अट्टाहास त्याचसाठी केला गेला. अंतिमतः या सर्वांसाठी मोजली जाणारी किंमत ही तुमच्या-आमच्या खिशातूनच जाणार आहे याचे भान सामान्य जनांनी ठेवायला हवे.

Exit mobile version