शिडी- ही आणि ती

आमच्या शुक्रवारच्या अंकात माथेरानची बातमी आहे. आसपासच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये राहणार्‍या आदिवासींना माथेरानमध्ये कामाला येण्यासाठी रोज जिवावर उदार होऊन एका शिडीवरून कसे चढून यावे लागते याचे वर्णन त्यात आहे. त्यांच्यासाठी पक्की वाट तयार करण्याचा आणि कड्यावर चढण्यासाठी सुरक्षित शिडी बनवण्याचा खर्च जास्तीत जास्त काही लाखांमध्ये असू शकेल. पण इतक्या वर्षात हा खर्च आणि ही शिडी काही होऊ शकलेली नाही. अर्थात त्याचं कारण स्पष्ट आहे. एखादं चालू सरकार पाडण्यासाठी आणि नवीन बनवण्यासाठी हे आदिवासी निरुपयोगी आहेत. मुख्यमंत्री तर सोडाच पण आमदारही त्यांच्या मतांवर अवलंबून असण्याची काही शक्यता नाही. त्याच वेळी महाराष्ट्रातील सत्तेची नवी शिडी उभी राहावी म्हणून तीन हजार किलोमीटरवर पूर्वेला गुवाहाटीमध्ये तन-मन-धन अर्पून शेकडो लोक कामाला लागले आहेत. सत्तेच्या एका शिडीवरून दुसरीवर उडी मारणारे आमदार नामक नामचीन कसरतखोर तिथे जमा झाले आहेत. आणि त्यांची ही कसरत यशस्वी व्हावी म्हणून दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांनी देव आणि पैसे पाण्यात घातले आणि वाहवले आहेत. एका माहितीनुसार सुरत ते गुवाहाटी या दरम्यानच्या चार्टर्ड विमानाचा खर्च किमान पन्नास लाख रुपये असावा. याखेरीज दर दिवसाला पाच ते दहा हजार रुपये जिथं भाडं आहे अशा आलिशान हॉटेलमध्ये कसरतखोरांची राहण्याची सोय आहे. त्याखातर रोज किमान तीन ते चार लाख रुपये खर्च होत असतील. जेवण अलग. शिवाय, हिंदुत्वाच्या मूळ रंगात मिसळून जाण्यासाठी उत्सुक या मान्यवरांच्या इतर ढंगांचे रंग तर आपल्याला कळणारही नाहीत. या महिनाअखेरपर्यंत हे हॉटेल बुक करण्यात आले असल्याच्या बातम्या आहेत. यापूर्वी सुरतमधील राहण्याचा खर्च यात धरलेलाच नाही. थोडक्यात हे प्रकरण काही कोटी रुपयांमध्ये जाईल हे स्पष्ट आहे. यापलिकडे या कलाकारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी दाखवली गेलेली आमिषे व त्यासाठी करावे लागणारे खर्च हे तर कदाचित शेकडो कोटींच्या घरात असू शकतील. यातले कसरतखोर असे बहाद्दर आहेत की, एका शिडीवरून दुसरीकडे उडी मारूनही मूळ शिडी आमचीच असा दावा करीत आहेत. शिवाय इतकं करूनही त्यांना सत्तेपर्यंत पोचायला त्यांना भाजप नावाची तिसरीच शिडी लागणार आहे. तर इकडे मुंबईत, मोडलीच आपली शिवसेनेची शिडी तर पुन्हा नव्याने बांधायला घेऊ असं पक्षप्रमुख आपल्या सहकार्‍यांना समजावत आहेत. या शिडीच्या बदलाबदलीमागे ईडी नावाची एक काडी आहे. शिवसेनेच्या शिडीवरून दुसरी कुठेही उडी मारणे ही एकेकाळी जिवावरची जोखीम होती. सध्याच्या कसरतवीरांचे मेरुमणी एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिघे यांनी त्याचे भीषण दर्शन एकेकाळी महाराष्ट्राला घडवले होते. याच दिघे यांच्यावर अलिकडेच सिनेमाही आला. नवीन पिढीच्या माहितीसाठी किंवा जुने जे विसरले असतील त्यांना आठवण करून देण्यासाठी असावा. तो काढण्यात शिंदे यांचाच पुढाकार होता असे म्हणतात. शिंदे यांचे सहाय्यक सचिन जोशी यांना सिनेमाच्या निर्मितीनंतर इडीची नोटीस आली आणि त्यामुळेच जुनी शिडी सोडायचा निर्णय झाला असेही सांगतात. गद्दाराला क्षमा नाही असा सिनेमाचा मूळ संदेश होता. पण शिंदे सरकारांनी तो बदलून ‘आपल्याला गद्दार म्हणणार्‍याला क्षमा नाही’ असा केलेला दिसतो.  असो. आसाम हादेखील कोकणासारखाच प्रचंड पावसाचा प्रदेश आहे. सध्या तिथं प्रचंड पूर आलेला असून त्यात कितीतरी पूल, शिड्या आणि रस्ते वाहून गेले असतील. सुमारे 55 लाख लोक विस्थापित झाले आहेत. 65 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र स्थानिक आणि देशभरचा मिडिया ते सगळे विसरून या बाहेरच्या शिडीवाल्यांचीच अधिक चर्चा करतो आहे. त्यामुळे यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वांना घेऊन तात्काळ निघून जावे असा इशारा तिथल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शुक्रवारी दिला. आमच्या माथेरानचे आदिवासी आधी आमच्या शिड्यांकडे बघा असा इशारा थोडाच देऊ शकणार आहेत? आणि ते बोलले तरीही सत्तेच्या सापशिडीच्या खेळातले फासे अशा बोलण्याने थरथरणार नाहीत याचा बंदोबस्त इथल्या शकुनींनी केला आहे.

Exit mobile version