आता स्नेहयात्रा

सतत नवीन वाक्प्रचार, नवीन मोहिमा हे भाजपवाल्यांचं खास वैशिष्ट्य आहे. अडवाणींच्या काळात भाजप ही पार्टी विथ डिफरन्स होती. आता बहुदा ती तशी राहिलेली नसावी. महाराष्ट्रात तर तिच्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेल्यांचाच भरणा अधिक आहे. असो. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी अच्छे दिन येणार होते. आता त्याविषयी कोणी बोलत नाही. नंतर सबका साथ सबका विकास असं एक इंजिन आलं. मागाहून त्याला सबका विश्‍वास वगैरे डबे जोडले गेले. त्याच धर्तीवर, रविवारी भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी कार्यकर्त्यांना स्नेहयात्रा काढण्याचे आदेश दिले. म्हणजे, इतके दिवस हा स्नेह भाजपच्या राजकारणात गायब होता का? देशातील सर्व घटकांपर्यंत आणि अल्पसंख्यांक समाजापर्यंत पोचण्यासाठी या यात्रा काढायच्या आहेत. आता दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या नेत्यांसाठी पुढचे काही दिवस स्नेह हा परवलीचा शब्द असेल. नुपूर शर्मा प्रकरणाचा दणका भाजपला चांगलाच बसलेला आहे असा याचा अर्थ आहे. महंमद पैगंबर यांच्याविषयी शर्मांनी केलेल्या शेरेबाजीमुळे कतारसह अनेक मुस्लिम देशांनी डोळे वटारले. इतके दिवस देशातील सुबुध्द नागरिक, वृत्तपत्रे, क्वचित प्रसंगी न्यायालये जे सांगत होती तेच या देशांनी सांगितले. देशातील सर्व मुस्लिम म्हणजे एक तर देशद्रोही किंवा दहशतवादी आहेत अशा रीतीने भाजप आणि त्याच्या मित्र संघटनांचे लोक सर्रास बोलू लागले होते. बहुसंख्य वृत्तवाहिन्या रोज रात्री याच रीतीने भाजपचा प्रचार करीत होते व अजूनही करीत असतात. त्यामुळे चेकाळून जाऊन भाजपचे प्रवक्ते अधिकाधिक भडक बोलू लागले होते. नुपूर शर्मा हे त्याचेच उदाहरण होते. ही वक्तव्ये आवरा असे आवाहन देशातील अनेक लोकांनी यापूर्वी करून झाले होते. पण मोदींपासून ते खालच्या लोकांपर्यंत सर्वांनी त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. मुस्लिम देशांच्या विरोधाने मात्र हे एकदम ताळ्यावर आले. स्नेहयात्रा हा त्याचाच परिणाम आहे. मात्र हीदेखील भाजपच्या इतर दिखाऊ मोहिमांसारखीच असण्याची शक्यता अधिक आहे. कारण मुळात मुस्लिमांबाबतचा दृष्टिकोन बदलला नसेल तर अशा यात्रा काढून काही फायदा होणारा नाही. उदयपूरच्या कन्हैय्यालाल याची काही मुस्लिम धर्मवेड्यांनी भीषण हत्या केली. त्याचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला. राजस्थानचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कन्हैयाच्या कुटुंबियांची भेट घेतली. काही वर्षांपूर्वी घरात गोमांस असल्याच्या नुसत्या संशयावरून अखलाख नावाच्या मुस्लिमाची हिंदू धर्मवेड्यांनी हत्या केली तेव्हा मात्र त्याचा निषेध करायला भाजपवाले तयार नव्हते. भाजपचे मुख्यमंत्री वगैरे तर सोडाच पण स्थानिक नेतेही त्याच्या कुटुंबियांना भेटले नव्हते. उलट अस्खंलनाविषयी विषारी प्रचार करण्यात भाजपचे समर्थक पुढे होते. या विखारी प्रवृत्तीचा जोवर मोदी स्पष्टपणे निषेध करीत नाहीत आणि या लोकांविरुध्द गुन्हेगारी खटले दाखल होत नाहीत तोवर स्नेहयात्रांच्या नावाने कितीही धूळफेक केली तरी काही उपयोग होणार नाही. मुस्लिमांना दुय्यम लेखण्याचा भाजपचा एक खास मार्ग म्हणजे निवडणुकांमध्ये एकाही मुस्लिमाला उमेदवारी न देणे. उत्तर प्रदेश, बंगाल यासारख्या मोठ्या संख्येने मुस्लिम असलेल्या राज्यांमध्येही भाजप कटाक्षाने एकाही मुस्लिमाला तिकिट देत नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण देशातही हेच घडते याचे मूळ भाजपच्या विचारसरणीमध्येच आहे. अर्थात यात नवल काहीच नाही. सर्वांची बँकेत खाती उघडण्यासाठी जनधन योजना सुरू करणे म्हणजेच गरिबी दूर करणे असे मोदी सरकार आपल्याला सांगत असते. अशा लाखो खात्यांमध्ये आता कदाचित एकही रुपया नसेल. तरीही त्या योजनेचे गौरवगान चालूच असते. त्याच धर्तीवर, भाजपच्या समभावाचे प्रतीक म्हणजेच या स्नेहयात्रा असा प्रचार कदाचित उद्या आपल्याला ऐकायला मिळेल. भाजप कार्यकारिणीच्या याच बैठकीत देशातील हिंसाचाराला काँग्रेसच्या धोरणांना जबाबदार धरण्यात आले. काँग्रेस या अत्यंत क्षीण झालेल्या विरोधकाच्या नावाने आपल्या समर्थकांना एकत्र ठेवण्याचे ‘नही तो गब्बरसिंग आजायेगा’ छापाचे धोरण भाजपने आता तरी बंद करावे. मोदींसारखा निर्विवाद लोकप्रिय नेता जवळ असून आणि पक्ष सातत्याने निवडणुका जिंकत असूनही हे का करावे लागते याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

Exit mobile version