सुलतानी संकट

मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हे संकटग्रस्त करून टाकलेले आहेत. अशा अस्मानी संकटानंतर या प्रदेशातील लोक आपल्या हरवलेल्या आप्तांना शोधण्यात, आसरा शोधण्यात, गमावलेल्यांना अंतिम निरोप देण्यात, मोडलेले घर पुन्हा बांधण्यात आणि जे आप्त गमावले त्यांच्यासाठी दुःख करण्यात बुडालेले असतात. या अस्मानी संकटासोबत येणार्‍या महागाई, रोगराई या संकटांचाही सामना त्यांना करावा लागतो. यामध्ये अजून एक संकट त्यांच्या संकटात एकप्रकारे भर घालते. ते म्हणजे विविध नेत्यांचे दौरे. या दौर्‍यांची पण एक विचित्र परिस्थिती असते. जावे तर तेथील मदतकार्यात, व्यवस्थांवर ताण पडतो. न जावे तर अशा परिस्थितीत सरकार जनतेच्या बाजूने उभे राहिले नाही, याचा रोष पत्करावा लागतो. तसेच सत्ताधारी नेत्यांपुढे अजून एक पेच असतो, तो म्हणजे त्यांनी तातडी नाही केली तर विरोधी नेते तेथे आधी पोचतात आणि आम्हीच कसे तुमचे सर्वप्रथम विचारपूस करणारे आहोत असे सिद्ध करतात. आणि सत्ताधारी आले नाहीत याबाबतीत ठणाणा केला जातो. सत्तारूढ नेत्यांपुढे परिस्थिती आटोक्यात कशी आणता येईल, नुकसान कमी कसे करता येईल, यासाठी परिस्थितीची माहिती घेऊन सर्व प्रशासनाला कार्यान्वित करण्यासाठी काय करता येईल, हे ठरवण्यासाठी वेळ हवा असतो. मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये या दौर्‍यांना प्राधान्य द्यावे लागते. म्हणून या राजकीय नेत्यांच्या सुलतानी संकटांमुळे संकटग्रस्तांच्या दुःखात काही अंशी कपात होत असली तरी एकंदर आवश्यक असलेल्या गोष्टींत अडथळे येऊ शकतात. परंतु अशा संकटाच्या वेळी किती वेळात कोण हजर झाले यावरूनही त्यांची कार्यक्षमता जोखली जाऊ शकते. खरेतर ही वेळ विवेकाने व तात्काळ निर्णय घेऊन नुकसान रोखण्याची असते. त्यासाठी आपल्या व्यवस्था किती कार्यक्षम आहेत, आपली प्रशासकीय जाळे किती सक्षम आहे याची तपासणी करायची असते आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करायची असते. जेणेकरून लोकांना लवकरात लवकर संकटातून बाहेर पडायला मदत होईल, नुकसान कमी होईल, मनुष्यहानी टळेल. परंतु सध्या तसे होताना दिसत नाही. सुरुवातीला अनेक तास लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर सारखी यंत्रणा देण्यातच बहुमूल्य वेळ वाया गेल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागले. त्याही आधी या भागाबद्दल या प्रदेशातल्या संकटाबद्दल कल्पना देऊनही प्रशासनाने, सरकारने वेळीच कार्यवाही केली नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. दुःख झाल्यानंतर अश्रू पुसणे वेगळे, परंतु मुळात हे अश्रू येण्याची वेळ येता कामा नये यासाठी कार्यवाही करणे वेगळे. आता उदाहरणार्थ तळीये येथे अनेकांना मृतदेह सापडले नाहीत, त्यांना मृत घोषित करण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला. हे दुःख पुसणार कसे? आर्थिक मदत देऊन त्यांना सावरायला मदत करणे, दिलासा देणे, त्यांच्या निवार्‍याची व्यवस्था करणे, त्यांना अन्न पाण्याची व्यवस्था करणे हे आवश्यकच आहे. परंतु त्या बाबतीतही खूप बेपर्वाई झालेली दिसते. कारण बर्‍याचदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध नेते जेव्हा असे पाहणी दौर्‍यावर येतात त्यावेळी प्रशासन, मदतकार्यातील पथके यांचे सगळे लक्ष त्याकडे वळते. तसे होणेही साहजिक आहे. परंतु त्याचा परिणाम म्हणजे त्या त्या वेळी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकते. आता अजूनही अनेकांचे दौरे सुरू आहेत. कारण सुमारे पंधराएक जिल्ह्यांत पावसाचे संकट गहिरे झाले आहे आणि त्यापैकी सात जिल्हे खूपच भीषण परिस्थितीत सापडलेले आहेत. आता वीजमंत्रीही एकंदर नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौर्‍यावर आले आहेत. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आधीच दौर्‍यावर आहेत. विरोधी नेतेही. परंतु, पावसाने विश्रांती घेतली असे वाटत असले तरी हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार राज्यातील या पूरग्रस्त जिल्ह्यातील पाऊससंकट अद्याप टळलेले नाही. शुक्रवारपर्यंत अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह अतिवृष्टीमुळे संकटग्रस्त झालेल्या सहाही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषत: येत्या तीन चार दिवसांत रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तेथील संकट अधिक गहिरे होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व नेत्यांनी तारतम्याने वागण्याची गरज आहे. संकटानंतर पोचण्यात कार्यक्षमता दाखवण्याऐवजी अशी परिस्थिती टाळता कशी येईल यावर सर्वच नेत्यांनी आता यंदाची परिस्थिती पाहून तरी भर द्यायला हवा.

Exit mobile version