संघाची परीक्षा

ऑस्ट्रेलियात टी ट्वेंटी विश्‍वचषकाला सुरुवात झाली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील तरुण संघाने पंधरा वर्षांपूर्वी पहिला चषक जिंकून इतिहास घडवला. 1983 मध्ये कपिल देवच्या संघाने मिळवलेल्या 50 षटकांच्या विश्‍वचषकाने क्रिकेटचं सत्ताकेंद्र आशियाकडे सरकलं होतं. धोनीच्या संघाच्या विजयानंतर भारत क्रिकेटमधील महासत्ता बनली. त्यानंतर भारतात झालेल्या पन्नास षटकांच्या विश्‍वचषकातही विजय मिळाल्याने त्यावर शिक्कामोर्तब केलं. भारत हा क्रिकेट खेळणार्‍या मूठभर देशांमधला सर्वाधिक लोकसंख्येचा देश असल्याने आपली दादागिरी वाढत गेली. भारतातील मध्यमवर्गाची संख्या सुमारे पंचवीस ते चाळीस कोटीच्या दरम्यान आहे. क्रिकेट खेळणार्‍या बाकीच्या देशांची मिळून सर्व लोकसंख्याही तेवढीच भरेल. त्यामुळे बाजारपेठ आणि चाहत्यांची पैसे खर्चण्याची क्षमता या दोन निकषांवर भारत हा इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरत गेला. फुटबॉलइतका नाही तरी त्याच प्रकारचा अमाप पैसा भारतीयांनी क्रिकेटमध्ये आणला. आपली आयपीएल लोकप्रिय होण्याचे कारणही तेच होते. इतर देशांतील अशाच स्पर्धा त्या मानाने यशस्वी झाल्या नाहीत. पण या काळात भारतीय क्रिकेट संघाचा दर्जा मात्र त्या प्रमाणात उंचावलेला नाही. गेल्या सुमारे दहा वर्षात आपण एकही विश्‍वचषक जिंकलेला नाही हे त्याचेच उदाहरण आहे. कसोटी क्रिकेटच्या विश्‍वचषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये पोचण्याची आणि नंतर हरून दाखवण्याची करामत आपल्या नावावर आहे. यंदाही ऑस्ट्रेलियात दाखल होत असताना आपल्या संघाविषयी खूप आशा बाळगाव्यात अशी स्थिती नाही. आपला सर्वात भरवशाचा आणि अचूक वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा आणि गेल्या काही काळात उत्तम फॉर्ममध्ये असलेला रवीन्द्र जडेजा हे दोघे फिट नसल्यामुळे संघाबाहेर आहेत. पण याला आपले क्रिकेटचे प्रशासकही जबाबदार आहेत. बुमराच्या दुखापतीविषयी अनेक महिन्यापासून बोलले जात होते. विश्‍वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने त्याच्यावर योग्य ते उपचार करून घेणे व इतर स्पर्धांमध्ये खेळण्याचा मोह टाळणे ही बुमरा व प्रशासक या दोहोंचीही जबाबदारी होती. पण ती पाळली गेली का याविषयी शंका आहे. आशिया चषक स्पर्धेत तो नव्हता. पण ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत दोन सामन्यात त्याला उतरवण्यात आले. त्याची बहुदा गरज नव्हती. जडेजा आशिया चषक स्पर्धेदरम्यान स्कीइंग करताना जखमी झाला. विश्‍वचषक तोंडावर आलेला असताना  दुखापतीच्या शक्यता असलेले साहसी खेळ खेळणे व खेळू देणे हा बेजबाबदारपणा होता. पण आपल्याकडे संघापेक्षा खेळाडू मोठे झाले असल्याने त्यांना कोण काय सुनावणार असा प्रश्‍न असतो. यामुळेच भारतीय संघाची सध्याची कामगिरी फारशी आशादायक नाही. आपली मधली फळी कमकुवत आहे. आपण अजूनही सतत प्रयोग करीत आहोत. मोठ्या स्पर्धेला उतरताना संघाची व्हावी अशी पक्की बांधणी झालेली नाही. तरीही प्रत्यक्ष स्पर्धेत संघ आपला खेळ उंचावेल अशीच भारतीयांची अपेक्षा असेल. संघ काय कामगिरी करतो ते कळेलच. पण भारतीय क्रिकेट प्रशासनातील राजकारणाचा वरचष्मा, अति-पैसा, बाजारू प्रवृत्तींचा सुळसुळाट या गोष्टींचा दुप्रभाव संघाच्या कामगिरीवर पडला आहे हेही लक्षात ठेवायला हवे. क्रिकेटच्या सर्व नाड्या ज्याच्या हातात आहेत त्या क्रिकेट नियामक मंडळ किंवा बीसीसीआयवर राजकारणी नकोत असे न्यायमूर्ती लोढा आयोगाने सांगितले. पण त्यात भारतीय पध्दतीने पळवाटा काढण्यात आल्या. आता मंडळाचे सचिव आणि सर्वेसर्वा अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह आहेत. अगदी अलिकडेच सौरव गांगुली यांना अध्यक्षपदावरून जावे लागले. पण शाह यांना मात्र मुदतवाढ मिळाली. याबाबतची बैठक अमित शाह यांच्या निवासस्थानीच झाली. भाजपचे आशिष शेलार आता मंडळाचे खजिनदार होऊ घातले असून मुंबई क्रिकेट असोसिएशनही त्यांच्या ताब्यात जाईल अशी लक्षणे आहेत. क्रिकेटच्या बाजारपेठेत भारताचा हिस्सा वाढवण्याच्या दृष्टीने शाह-शेलार इत्यादिकांचा उपयोग होईलही कदाचित. पण याच हव्यासापायी खेळाडूंवर नियंत्रण ठेवणे अशक्य होईल. संघातले सर्वच खेळाडू सट्टेबाजीसदृश गेमिंग कंपन्यांच्या जाहिराती करताहेत हे सध्याचे दृश्य अशा न-नियंत्रणाचे एक उदाहरण आहे. देशासाठी खेळण्याऐवजी आयपीएलसारखे क्रिकेट खेळण्याला प्राधान्य हेही त्यातूच घडू लागले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये एकेका खेळाडूची नव्हे तर आपल्या संघाची परीक्षा आहे.  

Exit mobile version